पान:ज्योतिर्विलास.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४४    ज्योतिर्विलास.

जिप्तच्या लोकांनी दिली असे कोणी म्हणतात. खाल्डियन लोकांनी ती दिली असे कोणी म्हणतात. तथापि इ० सनापूर्वी १००० च्या समारास क्रांतिवृत्तस्थ व इतर कांहीं तारकापुंजांच्या आकृतीवरून त्यांस नांवें पडलेली होती व ती त्या दोन्ही राष्ट्रांस माहीत होती, असे दिसते. इ० सनापूर्वी २१६० याच्या पूर्वीच खाल्डियन लोकांनी मेषादि बारा राशि ठरविले होते, त्यांपासून इजिप्तच्या लोकांनी ते घेतले असें कोणाचे म्हणणे आहे. इ० सनापूर्वी ३२८५ वर्षे ह्या कालीच इजिप्तच्या लोकांस मेषादि व इतर कांहीं राशि माहीत होते. व तेंव्हा ते व्याधाचे उदयास्त पाहत असत, असेही काही लोकांचे मत आहे. त्या देशांतील प्राचीन देवळांच्या भिंतीवरील चित्रलेख गेल्या १०० वर्षांत सांपडले आहेत, त्यांवरून ही अनुमाने करितात. बाबिलोनियांतील देवळांतलेही असे चित्रलेख सांपडले आहेत. प्राचीन इजिप्तचे लोकांनी सौरवर्षाचें मान बरेच सूक्ष्म ठरविले होते. बुध आणि शुक्र हे सूर्याभोवती फिरतात हे त्यांस समजले होते, असेही कोणाचे म्हणणे आहे. परंतु त्याविषयी खात्री नाही. ग्रीक लोकांत पुढें ज्योतिषशास्त्राचे ज्ञान वाढले तेव्हां त्यांस उपयोगी असे इजिप्तच्या लोकांच्या प्राचीन ज्ञानांत कांही सांपडले नाही. पुढे इजिप्त देशांत अलेक्झंड्रिया हे विद्यापीठ होऊन टालमी उपनांवाच्या राजांच्या अंमलांत तेथे वेधशाला झाल्या आणि अनेक प्रकारचे वेध होऊन ज्योतिषशास्त्रज्ञान वृद्धिंगत होऊ लागले. परंतु त्याचा संबंध प्राचीन इजिप्तच्या लोकांशी नाहीं, ग्रीकांशी आहे.

 चिनी लोकांचे इतिहासादि लेख फार प्राचीनकाळचे आहेत. त्यांतच ज्योतिषसंबंधे लेख आहेत. परंतु ते कितपत विश्वसनीय आहेत हे सांगता येत नाही.इ.स० पू० २५१४ आणि २४३६ या वर्षी सूर्यग्रहणे झाली होती असे त्यात लिहिले आहे. हे विश्वसनीय असेल तर फारच महत्त्वाचे होय. परंतु गणित व या ग्रहणांचा कांहीं पत्ता लागत नाही. त्यांची वेधयंत्रे व वेधपद्धती चांगली होती. त्यांच्या पद्धतीचें सांप्रतच्या युरोपियन पद्धतीशी साम्य आहे. त्याजपाशी याम्योत्तरलंघनयंत्र होते; आणि कालसाधनार्थ जलयंत्र होते. त्यांनी तारांच्याबयाम्योत्तरलंघनवेधावरून त्यांचे विषुवांश आणि क्रांति ठरविली होती. वेधाकरिता त्यांनी विषुववृत्ताच्या आसपासच्या २४ तारा ठरविल्या होत्या. म्हणजे त्यांच्यात नक्षत्रे २४ होती. व त्यांची तारा एकेकच होती. त्यांची नक्षत्रपद्धती आमच्याप्रमाणे नव्हती. त्यांच्या २४ तारांमध्ये कृत्तिकांतील एक तारा पहिली होती यावरून इ० स० पूर्वी २३२० च्या सुमारास ही पद्धति चिनी लोकांत होती असे गणिताने निघते. पुढे इ० स० पू० ११०० च्या सुमारास मघा, विशाखा,श्रवण आणि भरणी यांतील एकेक तारा जोडून त्यांनी एकंदर २८ नक्षत्रे केली.१९ वर्षांत सात अधिकमास घालण्याची पद्धति इ० स० पू० २६० वर्षी म्हणजे ग्रीकांपूर्वी २००० वर्षे त्यांनी शोधून काढिली. चंद्रसूर्यांच्या गतीचें ४६१७ वर्षांचे एक युग त्यांनी ठरविलें होतें. इ० स० पू० ११०० या