पान:ज्योतिर्विलास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४२    ज्योतिर्विलास.

रोहिणी तारेशी त्याचा समागम होतो. तेव्हां तो कधी कधी तिच्या फारच जवळ असतो. आणि कधी तर ती निराळी दिसत नाही, इतका दोघांचा एकजीव झालेल दिसतो. यावरून चंद्राची रोहिणीवर अत्यंत प्रीति सिद्ध झाली. आणि पुढे तर तो इतर भार्यांपेक्षा रोहिणीवर जास्त प्रीति करितो, या असमवर्तनाने त्यास क्षयरोंगही लागला. सांप्रत पृथ्वीवरील अत्यंत सुधारलेलें असें राष्ट्र घ्या किंवा अति नितकृष्टावस्थेत असलेले एकादें राष्ट्र पहा, सर्व लोकांमध्ये सूर्यचंद्रतारांविषयी अश प्रकारच्या काही ना काहीतरी कल्पना आणि दंतकथा आहेतच.

 दीर्घकालपर्यंत कल्पनेचे साम्राज्य झाल्यावर शास्त्राचा प्रादुर्भाव झाला. त्याने हळुहळू प्राबल्य होऊ लागले. पुढे दोहोंचा अधिकार समान झाला. आणि कांही कालाने तर शास्त्राने सत्ता बळकाविली. सांप्रतच्या कालास शास्त्रयुग म्हटलें तो चालेल. तथापि या युगांतही कल्पनेचा अधिकार समूल नाहीसा झाला आहे असे नाही. कल्पनेची सत्ता सर्वकाल चालणारच. मानवी मनास अत्यल्पायासाने आनंदसमुद्रांत नेऊन सोडणारी कल्पना कशी नाहीशी होईल ? ती पाहिजेच.

 पृथ्वीवरील निरनिराळ्या राष्ट्रांतील लोक हे मनुष्य जातीच्या व्यक्ति होत.मनुष्याचे ज्योतिषज्ञान कसकसे वाढत गेले याचा विचार करावयाचा तर ह्या व्यक्तीच्या ज्ञानाचा केला म्हणजे झाले. ज्योतिषशास्त्रसंबंधे पृथ्वीवरील प्राचीन लोक म्हणजे आशियाखंडांतील भारतीय आर्य, पारसीक, खाल्डिया प्रांतांतील लोक, आणि चिनी लोक; तसेंच पश्चिमेकडील इजिप्तचे लोक, आणि ग्रीक लोक, हे होत. ज्योतीषज्ञानास शास्त्राचे स्वरूप येईपर्यंत आकाशांतील ज्योतींविषयी मनुष्याच्या कल्पना कसकशा होत्या हे सांगू लागलो तर त्या कल्पनातरंगांनी आणि दंतकथांनी मोठा ग्रंथ भरेल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या पुष्कळ प्राचीन कथांची उत्पत्ति आकाशांतील चमत्कारांपासून आहे. मागील प्रकरणांत ही गोष्ट काहीशी दिसून आली आहे.--भारतवर्षीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचे माझें एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल, त्यांत आमचे वेद आणि दुसरे ज्योतिषशाखेतर यांत जें ज्योतिषज्ञान दिसून येते त्याचा संग्रह केला आहे. --पृथ्वीवरील सर्व ग्रंथांत वेदाइतका प्राचीन दुसरा ग्रंथ नाही. मनुष्याच्या सर्व प्रकारच्या आद्यस्तिथीचे चित्र त्यांत दिसून येते. आमच्या इतर ग्रंथांतही ज्योतिषविषयक अनेक उल्लेख आहेत. तेव्हां आमंच्या लोकांचे ज्योतिषविषयक ज्ञान आद्यस्थितीपासून कसकसे वाढत गेले हे सदरहू ग्रंथावरून बरेच दिसुन येईल. व त्यावरून सामान्यतः मनुष्य जातीच्या आद्यकल्पनांचेही काही स्वरूप समजेल. तसेच आमच्या लोकांच्या ज्योतिषज्ञानास शास्त्राचे स्वरूप आल्यावरचा त्याचा सविस्तर इतिहास त्या पुस्तकात आहे. म्हणून तोही येथे देत नाही.

 आशियांतल्या तुर्कस्थानांतील खाल्डियन आणि बाबिलोनियन* ह्या लो

-----

 * तैग्रीस आणि युफ्राटीस ह्या नद्यांच्या मुखाजवळील प्रदेशास बाबिलोनिया असें नांव होते.युफ्राटीस नदीच्या काठी बाबिलोन शहर होते. तेथे एका देवळाचा मनोरा १८०० फूट उंच होता त्यावर वेधशाला होती. येथील राजाचे उपाध्ये खाल्डियन लोक होते.