पान:ज्योतिर्विलास.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ?  ४१
आकाशस्थ ज्योतींविषयी लोक आजपर्यंत
काय म्हणत आले ?
---------------

 लोक काय म्हणणार ? जे दिसतें तें म्हणणार, दुसरे काय ? परंतु वस्तुमात्राची स्थिती जशी दिसते तशीच वास्तविक असते असा नियम नाही. कधी कधी चर्मचक्षुस एक दिसते, ज्ञानचक्षूस दुसरे वाटते. चर्मचक्षुस जे दिसतें तेंच खरे असा प्रथम ग्रह होतो परंतु कालांतराने ज्ञानचक्षूस वास्तवज्ञान होते. पहाटेस उठून पहावें तो अंधकार थोडा जाऊन थोडा थोडा उजेड पडू लागतो. पृथ्वी सपाट असून आकाशास लागलेली दिसते; तिच्या पूर्वबाजूस सूर्य उगवतो, आणि पश्चिमेस मावळतो. रात्री आकाशांत असंख्य तारा दिसतात. त्यांत चंद्र केव्हां तरी पूर्वेस उगवतो, आणि पश्चिमेस मावळतो. तारांकडे काही वेळ पहात बसले तर त्या पूर्वेस उगवून पश्चिमेस माँवळतात असे दिसते. चंद्र एकादे दिवशी सूर्यास्ताबरोबर पूर्वेस उगवला की सूर्योदयाबरोबर मावळत नाहीं; काही वेळाने मावळतो. अर्थात मार्ग पडतो असे दिसते. अशाच दुसऱ्या कांहीं तारा मागें पडतात. इतके ज्योतिषशास्त्राचे आरंभीचें ज्ञान. हे होण्यासही मनुष्योत्पत्तीनंतर बराच काळ लोटला असला पाहिजे. वस्तुमात्राचे बराच काळ अवलोकन झालें, तिजविषयी अनेक प्रकारचे अनुभव आले, म्हणजे त्याच्या स्थितीविषयी काही नियम दिसून येतात. आणि कालांतराने अशा नियमांचे शास्त्र बनते. परंतु त्यापूर्वी कल्पना तिरंगाचे प्राबल्य असते. वस्तूचे अवलोकन झाले की पुरे, लागल्याच कल्पना चालू होतात. कल्पनेला पाय टेकण्यास थोडीशी जागा सांपडली की तिचे आकाशात उड्डाण सुरू होते. कधी कधी तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या भराऱ्या चालू होतात. जगाच्या आरंभी कल्पनेचे साम्राज्य असलें पाहिजे हे उघड आहे. सकाळी पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळी पश्चिमेस मावळतो तो जातो कोठे ? दुसरे दिवशी तोच सूर्य उगवतोसें कशावरून? असे मनात येणे साहजिक आहे. एकाहून जास्त सूर्य होण्याचे मूळ हेच. कोणी बारा सूर्य कल्पिले आणि सूर्यचंद्र दोन दोन आहेत असें मानिले. याप्रमाणेच सूर्याला सहस्त्र नेत्र प्राप्त झाले. तो रथांत बसतो, त्याला सात घोडे आहेत,अशा कल्पना निघाल्या. चंद्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. कोणी म्हणतो ससा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर मनुष्य चंद्रावर* नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रसिक कवीने तर बिचाऱ्या चंद्रास नळाच्या घोड्याकडून लात मारविली आहे. चंद्र सुमारे २७ दिवसांत सर्व नक्षत्रांतून एकदा क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशी त्याचा सुमारे एकेक रात्र समागम असतो. यावरून चंद्राच्या सत्तावीस स्त्रिया झाल्या.

-----

 * ही कल्पना युरोपियन राष्ट्रोची आहे.