पान:ज्योतिर्विलास.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३८    ज्योतिर्विलास.

प्रजापतीने मस्तकाच्या एका बाजूस हात वर केला आहे, अशी कल्पना केली असतां ही आकृति चांगली जमते. मात्र हृदय फारच बाजूस गेले आहे. स्वाती तारेची वास्तवगति इतर तारांपेक्षा फार आहे. यामुळे हे वर्णन ज्या काली झाले तेव्हांपासून फार काळ लोटल्यामुळे हा फरक पडला असावा. युरोपियन लोक काही म्हणोत; आम्हांस नक्षत्रांचे ज्ञान निदान आठ हजार वर्षांपासून आहे,* माझं मत आहे.

 पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा यांच्या कोणी दोन दोन व कोणी चार तारा मानितात. नक्षत्रपट दोन यांत पूर्वाषाढांपैकी दुसरी व तिसरी आणि उत्तराषापाढांपैकी दुसरी व तिसरी ह्या चार तारा मिळून एक समांतरभुजचौकोन होतो त्याचा आकार काटकोनचौकोनाच्या जवळ जवळ आहे म्हटले तरी चालेल. त्याची पूर्वपश्चिम लांबी दक्षिणोत्तर रुंदीच्या सुमारे दुप्पट आहे. अप्रिलांत पहाटें हा चौकोन मध्यान्हीं येतो, त्या वेळेस दक्षिणेस तो सुमारे अर्ध्या आकाशांत असतो. चौकोनाच्या चार तारा इतरांपेक्षां अंमळ तेजस्वी आहेत. ह्यांच्या आसपास बाकीच्या दोन दोन बारीक तारा आहेत.

 अभिजित् नक्षत्राचा क्रांतिप्रदेशाशी संबंध नाही. ते फारच उत्तरेस त्यांतली मुख्य तारा पहिल्या प्रतीची आहे. जूनमध्ये ती आवशीस व जानुवारीमध्ये पहाटेस उगवते. अप्रिलांत पहाटेस मध्यान्हीं येते, तेव्हां खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २० अंश असते.

 श्रवणाच्या तीन तारांपैकी पहिली पहिल्या प्रतीची आहे.

 धनिष्ठांच्या कोणी पांच व कोणी सहा तारा मानितात. धनिष्ठापंचक प्रसिद्ध आहे. ह्या पांच बारीक तारा अगदी जवळ जवळ आहेत. श्रवणच्या पूर्वेस किंचित् उत्तर बाजूस त्यांचा झुबका दिसतो.

 अभिजितच्या जवळच ईशान्येस व धनिष्ठांच्या उत्तरेस सुमारे ३० अंश हंस नामक एक तारकापुंज आहे. त्यांत एक पहिल्या प्रतीची तारा आहे. नक्षत्रपट ३ यांत ही दिली आहे. ती मे महिन्यांत पहाटेस व आक्टोबरांत आवशीस मध्यान्हीं येते. व तेव्हां ती खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २५ अंश असते. नकाशांत आकाशगंगा दाखविली आहे, तीवरून व प्रत्यक्ष पाहून दिसून येते की सदरहू तारकापुंज आकाशगंगेंत आहे. हंस हे नांव आमच्या ज्योतिषग्रंथात नाही, पाश्चात्यांच्या नावावरून भाषांतर करून घेतले आहे, हे खरे. तरी आमच्या इतर ग्रंथांत ते आहे असे मला वाटते. हंस आकाशगंगेत स्नान करित असे वर्णन आपल्या काव्यपुराणादि ग्रंथांत पुष्कळ येते. हंसांस शरदृतु फार प्रिय आहे. आकाशांतील हंसपुंजांतील तारा आकाशगंगेत आहेत, व त्या शरदृतुच्या स्वच्छ आकाशांत आवशीस चांगल्या दिसतात. यावरून या दोहोंचा संबंध

-----

 * माझ्या दुसऱ्या एका पुस्तकांत ही गोष्ट निरनिराळ्या प्रमाणांनी सिद्ध केली आहे. पुस्तक काही दिवसांनी प्रसिद्ध होईल.