पान:ज्योतिर्विलास.pdf/४७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवांची मंदिरें.    ३१

वशीस मध्यान्हीं येते. व तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारे ३।४ अंश दिसते.

 रोहिणीची आकृति शकट म्हणजे गाडा या सारखी आमच्या ज्योतिषग्रंथांत सांगितली आहे. पश्चिमेकडची एक तारा ही शकटाची धुरा, आणि पूर्वेच्या ४ तारा ही चौकट दिसते. शनि, मंगळ आणि चंद्र हे या नक्षत्राजवळ येतात तेव्हां जर ते या शकटांतून गेले तर जगास मोठे अनिष्ट प्राप्त होते, अशी समजूत आहे. वराहमिहिर म्हणतो " काय सांगावें, शनि, भौम आणि चंद्र हे जर रोहिणीशकटाचा भेद करतील तर सर्व जग सागरांत बुडून क्षय पावेल. "सांप्रत शनि आणि भौम हे या शकटाजवळ येतात, तेव्हां त्यांतून जात नाहीत. चंद्र मात्र १८ वर्षात सुमारे ५।६ वर्षे शकटारोहण करितो. गणिताने असे सिद्ध होते की, पाच हजार वर्षापूर्वी मात्र शनि हा रोहिणीशकटभेद करीत असे. भौम तर त्याच्याही पूर्वी बरीच शतकें करीत असे. त्या अलीकडे आजपर्यंत ते कधी शकटभेद करीत नाहीत. दशरथाने केलेले शनीचे एक स्तोत्र प्रसिद्ध आहे. ते स्कंदपुराणापैकी काशीखंडांतलें असें त्यांत म्हटले आहे. "दशरथ राज्य करीत असतां, रोहिणीशकटाचा भेद शनि करणार असा योग एकदां आला. १२ वर्षे अवर्षण पडून अनर्थ ओढवणार म्हणून दशरथ नक्षत्रमंडळांत जाऊन शनीशी युद्ध करूं लागला. त्याच्या पराक्रमाने प्रसन्न होऊन शनीने त्यास वर दिला की, मी तुझ्या राज्यास पीडा देणार नाही. " अशी कथा त्या स्तोत्रांत आहे.

 रोहिणीसंबंधी आणखी वर्णन पुढे येईल.

 रोहिणीच्या जवळच वायव्येस कृत्तिका नक्षत्र आहे. ह्याच्या बारीक बारीक सात तारा आहेत. ह्यांचा एक झुबकाच दिसतो. पुष्कळांस ह्या माहीत असतात. कार्तिकस्नान करणाऱ्या लोकांचे तर हे घड्याळच आहे. कार्तिकांत ह्या आवशीस उगवतात. आणि ह्या मावळावयास गेल्या म्हणजे पहाट होते. फेब्रुआरीत ह्या आवशीस मध्यान्हीं येतात; व तेव्हां खस्वस्तिकाच्या किंचित् उत्तरेस दिसतात. कृत्तिकांची आकृति वस्तऱ्यासारखी सांगितली आहे. देशी वस्तऱ्या सारखी ती दिसते. सहावी व सातवी ह्या तारांमिळून वस्तऱ्याच्या मुठीचे टोंक होय; आणि बाकीच्या तारांचे पातें होतें.

 कृत्तिकांच्या सात तारांची नांवें तैत्तिरीय ब्राह्मणांत आलेली आहेत, तीच परिशिष्टांत मी दिली आहेत. सांप्रत सातांपैकी सहा तारा चांगल्या दिसतात. सातवी फार बारीक दिसते. पुराणादिकांत कृत्तिकांसंबंधे कथा आलेल्या आहेत,त्यांत बहुधा सहा कृत्तिका आहेत. कालांतराने कांहीं तारांच्या तेजांत फरक पडला. त्याप्रमाणे वेदकालांत सातवी तारा चांगली स्पष्ट दिसत होती, ती पुढे फार बारीक झाली, यामुळे पुराणग्रंथांतील कथांत ती नाहीशी झाली; किंवा वेदकालापा-


 १ -ह्याप्रमाणे खस्वस्तिकापासून अमुक अंश अमुक दिशेस असें या प्रकरणांत लिहिले आहे सुमारे १८ पासून २० पर्यंत अक्षांशांवरील स्थलांस अनुलक्षून आहे. २-बृहत्संहिता, अध्याय ९ वराहमिहिर हा शककालाच्या पांचव्या शतकात झाला. ३-३. १.४.