पान:ज्योतिर्विलास.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देवाची मंदिरें.    २३
देवांची मंदिरे.
---------------

 पृथ्वीच्या दैनंदिन भ्रमणामुळे भासणारे दिव्य भ्रमण मागच्या प्रकरणांत सांगितले. आतां दुसऱ्या एका अल्पशा भासमान दिव्य गतीचा थोडासा विचार करून मग आपण देवांची रत्नजडित मंदिरे पाहूं.

 चंद्र, सूर्य आणि तारा आकाशास चिकटल्यासारख्या आपल्यास दिसतात, परंतु आकाश म्हणून कांहीं वस्तुच नाही. मैदानांत उभे राहिले असतां लांबची झाडे आकाशास चिकटल्यासारखी दिसतात; परंतु आपण तिकडे जाऊं लागलों असतां त्यांतली कांही जवळ लागतात, काही त्याहून दूर असतात. त्याप्रमाणे चंद्र आपल्यास अगदी जवळ आहे; शुक्रसूर्यादिक त्याहून लांब आहेत; अभ्रे, वीज ही देखील तारांइतकी दूर असतील असे आपणांस वाटते, परंतु ती तर पांच चार मैलांवर असतात. चंद्र आपल्यास फार जवळ आहे. परंतु तोही अभ्रांच्या हजारों पट दूर आहे. मैदानांत एकाद्या झाडाभोवती फिरावें, आणि त्या झाडाचे टोंक आकाशांत कोठे दिसते हे पहावें. ते जसें ठेंगणे किंवा उंच असेल त्याप्रमाणे आकाशांत खालून किंवा वरून कोठून तरी त्याचा एक फेरा होतो असें दिसेल. त्याप्रमाणे पृथ्वी सुमारे ३६५| दिवसांत सूर्याभोवती फिरते, म्हणून तिजवरून पहाणारास सूर्य एका वर्षांत सर्व तारांतून पश्चिमेकडून पूर्वेकडे भ्रमण करितो असें दिसते. पृथ्वी रोज सुमारे एकेक अंश फिरते. यामुळे सूर्य एके दिवशी सायंकाळी ज्या तारेजवळ असतो, ती जरी आपल्यास दिसत नाही, तरी दुसऱ्या दिवशी सायंकाळी तो तिच्या पूर्वेस एक अंश आलेला असतो. म्हणजे त्या वेळी पूर्वेकडच्या सर्व तारा पूर्वदिवसापेक्षां एकेक अंश सूर्याजवळ गेलेल्या असतात. याप्रमाणे सायंकाळी पश्चिमेस महिना दोन महिने पहात असले तर तिकडील तारा उत्तरोत्तर सूर्याजवळ जाऊन दिसतनाशा होतात; आणि पूर्वेकडे नव्या दिसू लागतात. पहिल्या प्रकरणांत ही गोष्ट आपण पाहिलीच आहे.

 तारांतून सूर्य ज्या वर्तुळमार्गाने फिरतोसा दिसतो त्यास क्रांतिवृत्त म्हणतात. हा गमनमार्ग नियमित आहे. पृथ्वी आंसाभोवती फिरते, तेव्हा तिचा प्रत्येक बिंदु विषुववृत्ताशी समांतर फिरतो. परंतु ती सूर्याभोवती फिरते ती विषुववृत्ताच्या दिशेने फिरत नाही. यामुळे सूर्य पृथ्वीभोवती फिरतोसा दिसतो, तोही विषुववृत्तांतून फिरतोसा दिसत नाही. त्याचे फिरण्याचे क्रांतिवृत्त विषुववृत्तास तिर्कस छेदिते. हा तिर्कसपणा हल्ली सुमारे २३ अंश २७ कला* आहे. याला क्रांतिवृत्ताचे तिर्यक्त्व म्हणतात. एक बांगडी घ्यावी, आणि तीत बरोबर बसेल अशी म्हणजे

-----

 * कला म्हणजे अंशाचा ६० वा हिस्सा. कलेच्या साठाव्या हिश्शाला विकला म्हणतात. चंद्रबिंबाच्या वृद्धिक्षयाच्या संबंधाने कला शब्दाचा प्रयोग करितात, तेव्हां त्याचा अर्थ 'चंद्रबिंबाचा सोळावा भाग' असा होतो.