पान:ज्योतिर्विलास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२    ज्योतिर्विलास.

अंतर त्यास विषुवांश म्हणतात. हे विषुववृत्तावर मोजितात. पृथ्वीच्या दैनंदिन-भ्रमणामुळे सगळे विषुववृत्त २४ तासांत स्वतःभोवती प्रदक्षिणा करिते. म्हणजे २४ तासांत ३६० विषुवांश फिरते. म्हणून विषुवांश हे अंशांच्या रूपाने किंवा तासाच्या रूपाने म्हणजे कालाच्या रूपाने लिहितात. परिशिष्ट पहिले यांत तारांचे विषुवांश* होरात्मक ( तासांच्या रूपाने ) दिले आहेत.

 सूर्यचंद्र पूर्वेस उगवतात तेव्हां त्यांच्या व आपल्यामधील एकाद्या सरळ झाडाची खूण धरून त्यांजकडे पहावे; म्हणजे ते सरळ वर येत नाहीत, उजव्या अंगाकडे तिरप्या मार्गाने वर येतात, असे दिसेल. याप्रमाणे ताराही तिर्कस वर येतात. आपण विषुववृत्तावर असतो तर तेथे त्या समोर वर येतात, असे दिसले असते. तेथे दोन्ही ध्रुवबिंदु क्षितिजांत दिसतात. आणि त्या ध्रुवबिंदूतून जाणाऱ्या आंसावर पृथ्वी फिरते, म्हणून विषुववृत्तावरील लोकांस आंसाशी अगदी उभ्या म्हणजे लंबरूपाने तारा फिरतातशा दिसतात. आपण विषुववृत्ताच्या उत्तरेस आहो म्हणून आपली दृष्टि उत्तरध्रुवाच्या पलीकडे जाऊन ध्रुव आपणांस वर दिसतो. व आपल्या स्थळी आंस तिर्कस आहे, म्हणून सर्व तारा तिर्कस फिरतात. तिन्ही नक्षत्रपटांत विषुववृत्त दाखविले आहे. पूर्वेस तोंड करून नकाशा समोर धरून विषुववृत्त पहा तसेच पश्चिमेस पहा. म्हणजे ते जसे तिर्कस दिसेल तशाच रीतीने तारा तिर्कस उगवतात, आणि तिर्कस मावळतात. म्हणून थेट पूर्वेस उगवलेल्या ताराही मध्यान्हीं येतात तेंव्हा आपल्या डोक्यावर येत नाहीत, दक्षिणेस दिसतात. जसे जसे पृथ्वीवर उत्तरेस जावें तसतसा हा तिर्कसपणा वाढतो. इंग्लंदांत मार्च महिन्याच्या २१ तारखेस थेट पूर्वेस उगवलेला सूर्यही भरदोनप्रहरी दक्षिण बिंदूपासून फक्त सुमारे ३८ अंश वर दिसतो. आणि ध्रुवावर आपणांस जातां येईल तर तेथे त्या तारखेस सूर्य क्षितिजांतच दिसेल, व २४ तासांत क्षितिजांतूनच त्याची एक प्रदक्षिणा होईल. ध्रुवावर सहा महिने रात्र असते, तेव्हां तेथें सर्व तारा क्षितिजाशी समांतर फिरतात.आणि ध्रुवतारा डोक्यावर असते. ह्याप्रमाणे पृथ्वीवर एकाच स्थळी आणि निरनिराळ्या स्थळी हे दिव्य म्हणजे आकाशाचे भ्रमण चमत्कारिक आणि निरनिराळे दिसते.

-----
  • विषुवांश आणि क्रांति यांची वर्षगति दिली आहे तिजवरून कोणत्याही वर्षीचे विषुवांश आणि क्रांति ही काढितां येतील.


----------------