पान:ज्योतिर्विलास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिव्य भ्रमण.    १७

 अंशांवर असतो. आपल्यास चंद्रसूर्याची बिंबे दिसतात त्यांची रुंदी म्हणजे व्यास, हा वरील वर्तुलपरिघांतला सुमारे अर्धा अंश असतो. रुपये एकापुढे एक लावावे तशीं पूर्वबिंदूपासून खस्वस्तिकापर्यंत एकापुढे एक चंद्रबिंब लाविली तर १८० लागतील. २ चंद्रबिंबांनी सुमारें एक अंश भरतो. आकाशांतल्या इतक्या जागेस हात असेही म्हणतात. अर्थात् चंद्रसूर्यबिंबे वीतभर म्हणजे १२ अंगुळे असतात. ग्रहणाचा ग्रास अमुक अंगुळे आहे असे म्हणतात, त्याचा अर्थ यावरून समजेल.

 क्षितिजाचे उत्तरदक्षिण बिंदु आणि खस्वस्तिक यांतून एक वृत्त म्हणजे वर्तुळ काढिले आहे अशी कल्पना करा. या वृत्तास मध्यान्हवृत्त म्हणतात. याचे योगाने आकाशाच्या दृश्य गोलार्धाचे दोन भाग होतात. एकास पूर्वकपाल म्हणतात व दुसऱ्यास पश्चिमकपाल म्हणतात. सूर्य ह्या वृत्तावर आला म्हणजे मध्यान्ह होतो. मध्यान्ह म्हणजे दिवसाचा मध्य. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काळ जातो, त्याचे नांव दिवस. जसा सूर्याचा दिवस, तसा तारा उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काळ जातो तो तारांचा दिवस, असे म्हणण्यास हरकत नाही. दिवसाचें जें मान म्हणजे गोज तें दिनमान. आकाशांत तारा थेट पूर्वेस उगवोत किंवा पूर्वबिंदूच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस उगवोत; त्यांचा मार्ग कितीही लहान मोठा असो; त्या मार्गाचे मध्यान्हवृत्ताने दोन भाग होतात. हे वृत्त दक्षिणोत्तर असते म्हणून यास याम्योत्तरवृत्त असेही म्हणतात. याम्य म्हणजे यमाची दिशा म्हणजे दक्षिण.

 सर्व तारांचे तेज सारखे नसते. तेजस्वितेवरून तारांच्या निरनिराळ्या प्रती म्हणजे वर्ग करितात. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या तारांचे ६ वर्ग केलेले आहेत. दुर्बिणीतून यांहूनही फार बारीक तारा दिसतात. त्यांचे आणखी दहा वर्ग केले आहेत. म्हणजे तारांच्या एकंदर १६ प्रती आहेत. शाळेत पहिल्या वर्गात विदयार्थ्यांची संख्या थोडी असते, उत्तरोत्तर खालच्या वर्गात भरणा फार. जगांत श्रीमान् माणसें थोडी, खालच्या प्रतीच्यांचा भरणा उत्तरोत्तर अधिक. त्याप्रमाणेच स्थिति आकाशांत आहे. सर्वांत श्रीमान् ( शोभायमान् ) अशा पहिल्या प्रतीच्या तारा फक्त सुमारे २० आहेत. एकेका वर्गातील सर्व तारांचे तेज़ अगदी सारखें असते असे नाही. पहिल्या वर्गातल्या तारांत तर परस्परांत पुष्कळ अंतर आहे. परंतु तितके वर्ग करावे तर फार घोटाळा होईल.

 जानुआरीपासून सर्व उन्हाळाभर आवशीस आकाशांत दक्षिणेकडे पाहिले असतां सर्वात तेजस्वी अशी एक तारा दिसते. ती त्या बाजूस निमेच्या काही अलीकडे असते. तिच्या बरीच दक्षिणेस तिच्याहून किंचित् कमी परंतु इतर सर्वां"हून तेजस्वी अशी दुसरी एक तारा दिसते. ह्यांतील पहिलीला व्याध अथवा लुब्धक म्हणतात. दुसरी अगस्त्य होय. मार्च महिन्याच्या पहिल्या पंध्रवड्यांत आवशीस सुमारे सात वाजतां ह्या दोन तारा आपला अर्धा मार्ग क्रमून मध्यान्हवृत्तावर आलेल्या दिसतात. ह्या दोन्ही तारा पहिल्या वर्गातल्या आहेत.