पान:ज्योतिर्विलास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४    ज्योतिर्विलास.
दिव्य भ्रमण.
---------------

 काळोख्या रात्री आकाशाकडे पाहिले असतां सहस्रावधि तारा चमकत असतात. नीलवर्ण आकाशांत ही रत्नेंच बसविलेली आहेत की काय असे वाटते. ह्यांची कोणाला तरी गणना करवेल काय ? छे ! इतक्या तारा कसच्या मोजवतात, असें प्रथम मनांत येते. परंतु ह्या रत्नांस पाहून कोणास मोह पडणार नाही ती आपण हस्तगत करून घेऊ या, ती किती आहेत हे पाहूं या, अशा लोभानेंच की काय, ती ज्योतिष्यांनी मोजिली आहेत. आपणांस पृथ्वीच्या वर आकाश दिसते, तसेंच खाली दुसऱ्या बाजूसही आहे. त्यांतही तारा असतात. पृथ्वीच्या सर्व बाजूस जिकडे तिकडे तारा भरलेल्या आहेत. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या तारा सुमारे ६००० आहेत. त्यांतल्या अर्ध्या म्हणजे सुमारे ३००० मात्र आपल्यास एकदम दिसतात. परंतु सर्व तारा क्रमाक्रमाने आपणांस दर्शन देतात. दुर्बिणींतून किती तारा दिसत असतील असें तुह्मांस वाटते ? हर्शलच्या २० फूट लांबीच्या दुर्बिणींतून सुमारे २००००००० तारा दिसत. सांप्रत तिजहूनही मोठ्या प्रभावाच्या दुर्बिणी आहेत. त्यांतून दिसणाऱ्या तारांचा नक्की अजमास करितां येत नाही; परंतु त्यांची संख्या ३ कोटींपासून ५ कोटींपर्यंत आहे.

 तारा जेथे दिसतात तेथेच सर्वकाळ राहतात काय ? नाही. ही विक्षिप्त माणसे काय करितील आणि काय न करितील असें मनांत येऊन की काय कोण जाणे, त्या एकसारख्या पळत असतात. काहीं तर एका कोपऱ्यांत असतात; आणि अंमळसे डोके वर काढितात न काढितात, तोच दिसतनाशा होतात. त्यांस फार वर येण्याचे धैर्यच होत नाही. काही त्यांहून मोठा फेरा करितात. काही तर आकाशांत करवेल तितका मोठा फेरा करितात, परंतु तो दुरूनच करितात. आणि कांहीं बऱ्याच धीट असतात, त्या माणसांच्या दृष्टीआडही होत नाहीत. त्या फारशा भितऱ्या नाहीत खऱ्या, तरी काही वेळ उजवेकडून डावीकडे, कांही वेळ डावेकडून उजवीकडे, कांहीं वेळ आकाशांत बऱ्याच उंचीवर, काही वेळ अगदी खाली, अशा फिरत असतात. ह्या सगळ्यांचा एक नायक आहे, तो फारच धीट. तुह्मी त्याजकडे एकसारखे पहात रहा की कांहीं करा. तो हालत नाहीं की चालत नाहीं; खुंटासारखा आपला एके ठिकाणी ठाम उभा.

 दक्षिणेस तोंड करून घटका दोन घटका आकाशाकडे पहात बसा, म्हणजे काही तारा डावे कोपऱ्यांत उगवतात, थोड्याशा वर येतात, आणि उजवे कोपऱ्यांत मावळतात असे दिसेल. त्याहून जसजसे अलीकडे म्हणजे उत्तरेकडे वर वर पहात यावे, तसतशा तारा अधिकाधिक वेळ दिसत रहातात. पूर्वेस तोंड करून पहावें तो तिकडे तारा उगवत असतात; पांच सहा तासांनी पाहिले तर त्या सुमारे डोक्यावर येतात; आणखी पांच सहा तासांनी पाहिले तर पश्चिमेस मावळतात. ईशा-