पान:ज्योतिर्विलास.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा रूपानें कोणत्याच ग्रंथांत नाहीत. मराठीत तारांचे नकाशे आजपर्यंत दोनतीन झाले. परंतु त्या सर्वांपेक्षां आमची प्राचीन २७ नक्षत्रे व प्राचीन ग्रंथांतल्या इतर तारा यांची ओळख इतर कोणाच्या साह्यावांचूनही करून घेण्यास प्रस्तुत पुस्तकांतले नक्षत्रपट व त्यासंबंधी चवथ्या व तिसऱ्या प्रकरणांतील विवरण ही जास्त उपयोगी पडतील. इच्छा व प्रयत्न मात्र पाहिजे. ह्या नक्षत्रपटांतल्या तारांचे ज्ञान झाल्यावर रा० रा० दा० ग० केळकर यांच्या नकाशांवरून इतर तारांची माहिती करून घेण्यास फार सोपे पडेल. आठवें प्रकरण मराठीत नवीनच आहे. पांचवेंही तसेंच म्हटले तरी चालेल. १९ वें व २० वें हीही बहुतेक नवीन आहेत. शिवाय प्रत्येक प्रकरणांत कांहीं तरी नवीन आहे. परिशिष्ट १ हे तर बहुतेक मराठीत कोणास ठाऊकच नाही. आजपर्यंत कोणत्याही एका मराठी पुस्तकांत आलेली नाही अशी माहिती या पुस्तकांत निदान सवाशे पृष्ठेंं आहे. व सुमारे ४० पृष्ठेंं माहिती अगदी नवीन नाही तरी या पुस्तकांत ती अशा रूपाने दिली आहे की वाचकांस ती नवीच वाटेल.

 या पुस्तकांतील थोडीशी चित्रे इतर मराठी पुस्तकांत आहेत. परंतु बहतेक चित्रे मराठीत आजपर्यंत आली नाहीत अशी आहेत. या सर्वांचा व नक्षत्रपटांचा सुरेखपणा तर मराठीत एक खेरीज करून कोणत्याही इतर पुस्तकांत दृष्टीस पडावयाचा नाही.

 ग्रहांच्या प्रकरणांत त्यांची पुढील २ वर्षांची स्थिति दिली आहे. ती व इतर अनुभव घेण्यासारख्या गोष्टी पुस्तकांत पुष्कळ सांगितल्या आहेत, त्यांचा वाचकांनी आकाशांत अनुभव पहावा.

 या पुस्तकांतील काही प्रकरणे अशी आहेत की त्यांवर एकेक स्वतंत्र ग्रंथ होईल. त्यांतील विषयांचे विवेचन या पुस्तकांत यथावकाश केले आहे.

 इंग्रजी ग्रंथकारांपैकी न्यूकोंब, प्रॉक्टर, आणि लॉकियर, यांच्या ग्रंथांचा त्यांतही मुख्यतः पहिल्याच्या पुस्तकाचा आधार प्रस्तुत पुस्तकास विशेषतः आहे. ग्रहांच्या प्रकरणांत त्यांवर वस्ती आहे की नाही याविषयी अनुमाने आहेत. त्यांस आधार मुख्यतः प्रॉक्टरच्या ग्रंथांचा आहे. परिशिष्ट १ यांतील विषुवांश आणि क्रांति ही अंगें मुख्यतः फ्रेंच भाषेतील connaissance des temps ( कालज्ञान ) या नांवाच्या वार्षिक पंचांगावरून, काही इंग्रजी Nautical Almanac ( नाविक पंचांगा ) वरून व काही इंग्रजीतील प्रसिद्ध तारास्थितिपत्रकांवरून घेतली आहेत. या पुस्तकांतले नक्षत्रपट तयार करितांना रा० रा० बाबजी विठ्ठल कुळकर्णी यांचा 'तारकादर्श' व रा० रा० दामोदर गणेश केळकर यांचे 'आकाशाचे देखावे' मला पहाण्यास सांपडले. मराठीतली ज्योतिःशास्त्राची बहुतेक पुस्तकें मी केव्हां तरी पाहिली आहेत. अर्थात् तदधिगत ज्ञानाचा उपयोग हे पुस्तक लिहितांना झालाच आहे. शिवाय अनेक संस्कृत व इंग्लिश पुस्तकांचा उपयोग हे पुस्तक लिहितांना झाला आहे. त्यांची नावे कोठवर लिहावी? या सर्व ग्रंथांच्या गत