पान:ज्योतिर्विलास.pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वप्न-खरेंच.    १३

आहे हे पाहण्याची उत्सुकता होऊन मी मागे वळलो. पुन्हा ते बुद्धिमान् प्राणी दिसू लागले. ते उद्योगांत गर्क होते, हे पाहून मला आनंद व आश्चर्य वाटले. कोणी भक्ष्य मिळवीत होते; कोणी घरे बांधीत होते; कोणी सडका तयार करीत होते; कोणी जलपर्यटनांत गुंतले होते. आणि काय सांगावें ! कोणी आपसांत क्षुल्लक गोष्टींवरून भांडत होते. आणि कोणी तर कडाक्याच्या युद्धांत गुंतले होते. उभयपक्षांकडील हजारों चिमुकले वीर मरून पडत, तरी ते लढाई सोडीत नसत. माझ्या प्रवासांत ज्या गोष्टी आढळल्या होत्या त्या त्यांस सांगून त्या प्राण्यांचे क्षुद्रत्व त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांस कलहनिवृत्त करावे, असे माझ्या मनांत आले. इतक्यांत त्यांतल्यांपैकी काहींना त्या सर्व कळून आल्या आहेत असे दिसले. कांहीना तर त्यांच्या अशा प्रकारच्या ज्ञानाचा गर्व झाला होता. माझ्या लहानशा बोटा एवढ्या जागेत लक्षावधि दिसून येतात, इतके हे क्षुद्र आणि दुर्बल जीव, परंतु त्यांचा गर्व आणि हांव किती म्हणून सांगावी! आह्मी आपली घरे, सडका बांधूं शकतों; त्याप्रमाणेच हे लहानसहान गोल दिसतात तेवढाले गोल आह्मी निर्माण करूं; किंबहुना मधला १२ यार्ड व्यासाचा जो तेजस्वी गोल तोही आह्मी तयार करूं; इतकी विलक्षण त्यांची हाव दिसली. त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा क्षुद्रपणा त्यांस दाखवावा, त्यांचा मूर्खपणा त्यांस उघड करून सांगावा, आणि इतक्या दूरच्या गोष्टी ज्यांस कळतात त्यांनी इतका गर्व करणे हेच केवढें आश्चर्य आहे हे त्यांच्या मनांत भरवून त्यांची निर्भत्सना करावी, अशा विचारांत मी होतो. आणि माझी शक्ति व माझी दृष्टि तुमच्याहून फारच विलक्षण आहे त्या अर्थी माझा उपदेश तुह्मी ऐका असें आकाशांतूनच मी त्यांस सांगू लागणार इतक्यांत काय झाले नकळे. मी लहान लहान होत आहे, असे मला वाटले. दिव्य शक्ति मला सोडून जाऊं लागल्या. भरदिशी मी त्या क्षुद्र प्राण्यांत येऊन पडलों आणि जागा झालो. पहातो तो मी त्या क्षुद्र जीवांतलाच एक आहे. झाले माझें स्वप्न. हें स्वप्न म्हणावें तर ह्याची १२,६७,२०,००० पट केली असतां हे खरेंही आहे.

---------------