पान:ज्योतिर्विलास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  ज्योतिर्विलास.
स्वप्न-खरेंच.

 एका रात्री मला स्वप्न पडले. मला दिव्यदृष्टि आणि अलौकिक शक्ति प्राप्त झाली. एक धगधगित गोळा दिसला. त्याचा व्यास सुमारे १२ यार्ड होता. तो गोल मजपासून सुमारे पाऊण मैल होता. त्याचा प्रकाश पडला होता, आणि तो स्वच्छ पांढरा असून एकाद्या लोहाराच्या जाज्वल्य भट्टीतील आगीपेक्षाही प्रखर होता.

 माझ्याजवळच छोटासा गोल मला दिसला. त्याचा व्यास सुमारे ४ इंच होता. तो गोळा हळुहळू पुढे चालला होता. परंतु त्याचा फिरण्याचा कल त्या तेजस्वी गोलाच्या अनुरोधाने होता असे दिसले. आणि याप्रमाणे फिरता फिरतां तो आपल्या भोवताही फिरत होता. त्या तेजस्वी गोलाचा प्रकाश या लहान गोलाच्या अर्ध्या भागावर पडला होता, म्हणून हा दिसे तरी. नाही तर अफाट अंधकारमय अवकाशांत गडप होऊन तो दिसलाही नसता. अंमळ बारीक नजरेने पाहिले तो त्याच्याजवळ त्याहून लहान असा एक गोल असून तो मोठ्या गोलाभोवती फिरत होता. धाकट्याचा व्यास सुमारे एक इंच होता, आणि तो मोठ्यापासून सुमारे दहा फुटांवर फिरत होता. त्यावरही त्या मध्यवर्ती तेजोगोलाचा प्रकाश पडत असे. मला सूक्ष्मदृष्टि प्राप्त झाली असल्यामुळे, त्या दोहों गोलांपैकी मोठ्याचा थोडा भाग कोरडा आहे, व बाकीच्यावर पाण्याचे अति पातळ कवच आहे, असे दिसले. त्या पाण्यांत लक्षावधि जीव इकडे तिकडे संचार करीत होते. आणि काय सांगावे, ते अति सूक्ष्म होते, तरी त्यांतील कोणी पुढे पळत आहेत, दुसरे त्यांच्या मागे लागले आहेत, असे दिसले. आणि एवढी खटपट मुख्यतः कशाकरितां तर पुढचा जीव आपल्यास गट्ट करावयास सांपडावा. कोरड्या भागावरही कांही जंतु दिसले. ते कोठे पुष्कळ होते व कोठे थोडे होते. माझ्या बचकेंत राहील एवढ्या ह्या गोटीवरही असंख्यात जंतु होते हे पाहून मला आश्चर्य वाटले. वास्तविक त्यांस जंतु म्हणणे देखील शोभत नाही, इतके ते लहान होते.

 कोरड्या प्रदेशावरील जंतूंमध्ये काही प्राणी इतरांपेक्षा काही विलक्षण दिसले. हे इतरांपेक्षा मोठे होते, किंवा ह्यांचे स्वरूप काही विलक्षण होते, असे नाही. इतर काहीपेक्षा हे लहानच होते. परंतु ह्यांस बुद्धि आहे असे दिसून आले. त्यांनी आपल्याकरितां छोटेखानी वसतिस्थाने बांधिली होती, व आपल्या जातीच्या प्राण्यांच्या सोईसाठी लहानमोठे रस्ते केले होते. त्या रस्त्यांवरून ते गाड्यांतून बसून जात. तसेच पाण्याच्या कवचांतूनही कसल्याशा पदार्थात बसून ते तरून जातांना दिसले. कवचाला ती खोली कोठची? परंतु त्यांच्या त्या तरणपात्रास ती भारी होती. केव्हां केव्हां माझ्यासारखा कोणी त्यावर फुंकर घालीत आहेत की काय असें वाटे. परंतु तेवढ्याने त्या पाण्याचा कल्लोळ होऊन जाई, आणि त्यांत त्या प्राण्यांची तरणपात्रे पालथीं होऊन प्रळय उडे. तेव्हां शेकडो प्राणी पाण्यांत गडप होत. तथापि पुन्हा हजारों प्राणी त्या जलकवचांतून जात येत. त्या उदकांतून कोळ्या-