पान:ज्योतिर्विलास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हा काय चमत्कार आहे?   

शोभा आली, की हिने तिला आली, अशी भ्रांति पडून ही पहावी की ती अवलोकन करावी असे होऊन गेले. शारदचंद्र कुमदांसही आनंद देऊन प्रफुल्लित करू लागला, मग तो आह्मासारख्यांस आनंदकारक होईल यांत काय नवल! सहा महिन्यांपूर्वी सायंकाळी पश्चिमक्षितिजाजवळ ज्या तारा दिसत असत त्या हल्ली सायंकाळी पूर्वेस दिसू लागल्या; इतके त्यांचे दूरगमन झाले तरी त्यांचे परस्परांचे अंतर बदलले नाही. तेव्हां तारांस गति आहे की नाही, असा आम्हांस संशय आला; व तारांबरोबर पश्चिमेस सायंकाळी शुक्र दिसत होता तोही पूर्वेस आला की काय म्हणून पाहूं लागलों, तो तो मात्र कोठे दिसेना; तो काय झाला ? नाहीसा झाला की काय ? असे गूढ पडले.*

 असो तर, याप्रमाणे कांहीं तारा पश्चिमेस नाहीशा होत जातात, व पूर्वेस नव्या तारा उगवू लागतात; सहा महिन्यांनी पश्चिमच्या तारा पूर्वेस दिसू लागतात, तरी त्यांचे अंतर बदलत नाहीं; शुक्रासारख्या काही तारा इतरांसारख्या स्थिर न राहतां त्यांतून चालतातशा दिसतात; चंद्र तर विलक्षण झपाट्याने चालत असतो इतकंच नाही, तर पंधरा दिवस लहानाचा मोठा होत जाऊन पुनः लहान होऊ लागतो व शेवटी दोन दिवस तर मुळीच दिसत नाहीं; कांहीं तारा पतन पावतातशा दिसतात; काहींना तेजाचे भव्य पुच्छ असते; काही दिवस तारांच्या ठिकाणी अभ्रे आणि विजा हीच संचार करितात; सूर्यचंद्रासारख्या तेजोगोलांवर डाग दिसतात; दुर्बिणीतून शुक्र चंद्रासारखा दिसतो व एका तारेच्या ठिकाणी हजारों तारा दिसतात. अशा विलक्षण उलाढाली व गूढे पाहून सहज कोणीही मनुष्य आपले मनास विचारूं लागतो की, हा चमत्कार आहे तरी काय?

-----

 * ज्योतिःशास्त्राच्या विषयांचे दिग्दर्शन करणाऱ्या ह्या उपोद्घातरूप प्रकरणांत एथवर वर्णिलेली आकाशांतील तारकादिकांची स्थिति सामान्यतः कोणत्याही काली घडण्यासारखी आहे; व विशेषतः ती सन १८९२ च्या एप्रील महिन्यापासून सात आठ महिन्यांमधली आहे.

---------------