पान:ज्योतिर्विलास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
   ज्योतिर्विलास.

कांतीकडे सर्वांचे चित्त वेधून गेले. आह्मी बराच वेळ तिकडे पहात असतां, त्याजवर एक डाग दृष्टीस पडला. तेव्हां असें मनांत आले की, पूर्णासही कलंक असावा काय ? परंतु त्याविषयी आमचा कोणी मित्र म्हणाला, चंद्रावर मोठा डाग आहे इतकेच नाही, तर सूर्यावरही लहान लहान डाग दिसतात. अग्नीसारखा तेजोगोल, ज्याकडे डोळ्यांनी पहावत नाही, त्यावर डाग असावे हे किती आश्चर्य ! आम्हांस तर प्रथम हे खोटेंच वाटले. परंतु दुर्बिणीतून आमच्या मित्राने ते डाग दुसरे दिवशी आम्हांस प्रत्यक्ष दाखविले. ते पाहून फार विस्मय वाटला. मग आणखी काही असेच चमत्कार दिसतात की काय म्हणून त्या दुर्बिणीतून रात्री पाहूं लागलों, तो शुक्राच्या ठिकाणी चंद्र दिसू लागला, नुसत्या डोळ्यांनी पहावे तों शुक्र, दुर्बिणीत पहावे तो चंद्र! बरें, दुर्बिणीतून शुक्र न पहातां खरोखर चंद्रच आह्मी पाहिला असे म्हणावें, तर चंद्र त्या वेळी मुळीच नव्हता. तारांकडे दुर्बीण लाविली तो त्या पूर्वीपेक्षां विलक्षण तेजस्वी दिसू लागल्या. दुर्बिणीतून पहाण्यापूर्वी ताराची चकाकी आह्मांस आश्चर्यकारक वाटे, परंतु दुर्बिणीतून दिसणाऱ्या तेजापुढे ती कांहींच नाही, अशी आमची खात्री झाली. आह्मी तारा न पहातां हिरे, माणके, पांच, इंद्रनील इत्यादि रत्नांचे मोठाले समुदायच पहात आहों की काय असें वाटे. कोठे एका तारेच्या दोन तारा दिसत, कोठे तीन व कोठें चारही दिसत; आणि कोठे कोठे तर नुसत्या डोळ्यांनी जेथें पूर्वी एकादीच तारा दिसावयाची तेथें दुर्बिणीतून हजारों तारा दिसत. हे दुर्बिणीतून दिसणारे विलक्षण चमत्कार पाहून आह्मांस भूल तर पडली नाही ना असे वाटू लागले.

 याप्रमाणे काही दिवस गेले असतां, वातावरणांत एकाएकी विलक्षण फेरबदल झाला. वाऱ्याची दिशा बदलली, समुद्र खवळला, झंझावात ( पर्जन्ययुक्त मोठा वारा) वाहूं लागला, आकाशांत रात्री जेथे हजारों तारा चमकत होत्या तेथे अभ्रें फिरू लागली व विजा चमकू लागल्या. नक्षत्रराजादिकांनी आपला अधिकार मेघराजाकडे दिला. तेव्हां कोठचें नदीतीर, कसचे हवा खाणे, आणि कसचे आकाशांतील चमत्कार! सर्वच काही बदलून गेले. काही दिवस अशी धामधूम चालल्यावर पुढे हळुहळू आकाशात शांतता दिसू लागली. उन्हाळ्यांत पश्चिमक्षितिजाजवळ दक्षिणच्या बाजूस दोन तारा दिसतनाशा झाल्या म्हणून सांगितले, त्यांपैकी टक्षिणची अगस्त्याची तारा सुमारे तीन महिने तर मुळीच दिसत नव्हती. ती पूढ़ें मग पहाटे पूर्वेकडे दिसू लागली.

  प्रससादोदयादंभः कुंभयोनेर्महौजसः |

 --" महा तेजस्वी अशा कुंभसंभवाच्या (अगस्त्याच्या ) उदयानंतर उदक स्वच्छ झालें." या कालिदासोक्तीला फार काळ लोटल्यामुळे, तितक्या काळांतील तारांच्या गतिविशेषाच्या योगानें, अगस्त्योदयानंतर लागलीच नाहीत तरी सुमारे दोन महिन्यांनी उदकें स्वच्छ झाली. जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्लित होऊन गगनश्रीशी स्पर्धा करू लागली. आह्मांसारख्या चमत्कारप्रियांस, वनश्रीने गगनश्रीस