पान:ज्योतिर्विलास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
   ज्योतिर्विलास.

टके म्हणत नाचत बागडत असतात. चंद्रबिंबावरून ढग धांवत असलेले पाहून 'चंद्र धांवत आहे ' असे कोणी मुलें म्हणत असतात व कोणी ' चंद्र धांवत नाही, ढगच धांवत आहेत' अशी त्यांची समजूत करीत असतात. कोणी आकाशकटाहांत सर्वत्र पसरलेली हजारों नक्षत्रे पाहून 'परडीभर फुलें, तुझ्याने वेंचवतना माझ्याने वेंचवतना' अशा उखाण्यांनी त्यांचे अनंतत्व, अपारत्व व चिरस्थायित्व दर्शवीत असतात. सारांश, केव्हां ना केव्हां थोडा फार वेळ तरी आकाशांतील तेजांचे विलास पाहून आनंदाश्चर्यसमुद्रांत पोहत नाही असा कोणी नाही.

 सहस्त्ररश्मीस राग येऊन त्याने आपल्या तीव्रकरांचा मारा सुरू केल्यामुळे गर्भगलित होऊन त्यापुढे तोंड वर काढण्यासही भिऊन गेलेली व गार वाऱ्याची एकादी झुळूक येऊन ती क्षणभर तरी या तापासून मुक्त करील की काय अशाविषयी उत्कंठित झालेली आमची काही मित्रमंडळी, तो उष्णरश्मितपन गेला की आहे, गेला की आहे, हे हळूच पहात पहात तो कोठे दिसेनासा झाल्यावर काही वेळाने बाहेर पडून एका नदीच्या तीरी गेली. नदीच्या रमणीय उदकाने त्यांच्या तापविमोचनाशेला पाझर फुटूं लागला. इतक्यांत पश्चिमच्या बाजूस सुंदर तेज चमकू लागले, तिकडे त्यांचे लक्ष्य गेलें. किती तरी आनंददायक तेज तें ! त्याला पाहून सर्व दिवसाचा ताप नाहीसा होत चालला. जसजसे त्याजकडे पहावे तसतसे अधिकाधिकच कौतुक वाटू लागते. त्याजकडे पहातच रहावे असे वाटते. काळोख पडत चालला तसतसे ते अधिकच चमकू लागले. त्याच्या भोंवतीं लहानमोठ्या अनेक तारा* चमकत होत्या. गेल्या दहा बारा दिवसांत या बाजूस कधी दृष्टीस न पडून आजच नवीन दृष्टीस पडल्यामुळे ते विशेषच चित्ताकर्षक झाले होते. अनेक मनुष्य त्याजकडे पाहून आनंदभरित होत होती. कोणी त्यास वंदन करीत होती. कोणी त्याजकडे आपल्या वस्त्राची एक दशी फेंकून 'जुनें घे आणि नवें दे' म्हणत होती. ती द्वितीयेची नूतन चंद्रकला ईश्वरी तेजाची साक्षात् प्रतिमाच आहे काय अशी वाटण्याजोगी आनंददायक खरीच. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतीरी दोन घटका बसून करमणूक करण्याचा मंडळीचा क्रम चालला होता, त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीही ही मंडळी गेली. कालच्यापेक्षां आज चंद्र पश्चिम दिशेस बराच वर दिसूं लागला. आणि त्याची तेजस्वी कोरही सुमारे कालच्या दुप्पट आज दिसत होती. चंद्राच्या वरच्या बाजूस सुमारे अर्ध्या आकाशांत एक अतिमनोहर तारा दिसत होती. सगळ्या आकाशांत तितकी तेजस्वी आणि रमणीय दुसरी ताराच नव्हती. अहाहा, काय तिचें तेज! संस्कृत भाषेत तेजाला शुक्र असे एक नांव आहे. आपण त्या तारेस शुक्र असें म्हणूं. चंद्र पहिल्या दिवशी दिसला तेव्हां त्यापासून ती लांब होती. दुसऱ्या दिवशी तिच्या बराच जवळ चंद्र आला. जणुकाय शुक्राच्या तेजस्वितेमुळे चंद्राच्या मनांत स्पर्धा उत्पन्न झाली आहे आणि आपल्या तेजाची एकेक कला वाढवून आपण शुक्राचे अतिक्रमण करावे असे चंद्राने मनांत आणिलें आहे, असें दिसूं

-----

 * हा शब्द मूळचा स्त्रीलिंगी असल्यामुळे ह्या ग्रंथांत तसा घातला आहे.