पान:ज्योतिर्विलास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ज्योतिर्विलास
अथवा
रात्रीची दोन घटका मौज.
---------------
हा काय चमत्कार आहे ?
---------------

 तेजोनिधि सविता पश्चिम-दिक्प्रांती विश्रांति घेण्यास जात आहे आणि तेणेकरून सकल व्यवसायी जनास तसेंच करण्याविषयीं सुचवीत आहे, हे पाहून प्रातःकालापासून त्या सवित्याने आपल्या नावाप्रमाणे* नानाप्रकारच्या उद्योगाविषयी प्रेरित केलेला जन आपापला कामधंदा आटपण्यास लागतो. कोणी आपल्या वसतिस्थानाच्या इतस्ततःप्रदेशी असलेल्या देवांच्या दर्शनास जात असतात. कोणी नदीतीरी संध्यावंदनादिकांनी ईशचरणीं मन लावून भक्तिरसानें परमानंदसमुद्रांत मग्न होत असतात. कोणी समुद्रकांठी, नदीतीरी, किंवा मैदानांत हवा खाण्यास जाऊन दिवसभर थकलेल्या मनास निसर्गदर्शनोपभोगादिकांनी विश्रांति देत असतात. काही वेळाने कोणी भोजनादिक आटपून घराबाहेर आंगणांत किंवा दुसऱ्या एकाद्या उघड्या जाग्यांत बसून किंवा शतपावली करीत करीत ईश्वरगुणानुवाद करीत असतात. कोणी काव्यशास्त्रकला-विनोदांत निमग्न असतात. कोणी मित्रांसह इकडल्या तिकडल्या गप्पा छाटीत असतात. सर्वांचेच असें भाग्य कोठले ? कोणी एका व्यवसायांतून सुटून उदरभरणार्थ दुसऱ्या व्यवसायास लागतो. कोणी पाकनिष्पत्ति करीत असतो. कोणी चिंतामग्न असतो. तथापि असाही मनुष्य मुद्दाम म्हणा, किंवा साहजिक म्हणा, रात्रीच्या पूर्वभागी क्षणभर विश्रांति घेतोच घेतो. व अशा अनेक प्रकारांनी विश्रामसुखास्वाद घेणाऱ्या मनुष्याचे आकाशाकडे एकादे वेळी तरी सहज लक्ष जाते. तशांत भगवान् रजनीवल्लभ उदय पावलेला असला तर तो आपल्या आनंददायक चन्द्रिकेने मनुष्याचे मन आपल्याकडे सहज आकर्षितो. प्रतिपदाद्वितीयेची चंद्रकोर पाहून ज्याचे मन आनंदभरित होत नाही असा कोण आहे ? रमणीय पूर्णचंद्र पाहून क्षणभरही ज्यास दुःखाचा विसर पडत नाही इतका हतभागी कोण आहे ? लहान मुलेही मातेच्या कटिप्रदेशी आरोहण करून चांदोबाकडे पाहून आनंदभरित होतात. कोणी 'चांदोबा चांदोबा भागलास का ' इत्यादि चु-

-----

 * सविता म्हणजे प्रेरणा करणारा.