पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेवा : सुरक्षा आणि शाश्वती  

आपल्या समाजात नोकरदार व मजूर मोठ्या संख्येने आहेत पैकी काही संघटित तर काही असंघटित आहेत. संघटितांच्या संघटना असतात. संघटनशक्तीच्या जोरावर नोकरदारवर्गास पगारवाढ, सेवा सुरक्षा, आरोग्य अनुदान, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन असे अनेक लाभ मिळतात. त्यामुळे नोकरदार वर्ग व त्यांचे कुटुंबीय यांना सेवा सुरक्षिततेतून सुखपूर्ण जीवन लाभते. शासन त्यांना सतत महागाई भत्ता, पुढील वेतनवाढ, पदोन्नती देत असते. संघटित क्षेत्रातील नोकरदारवर्गास विशेषतः शासकीय, निमशासकीय सेवकांना सतत वरचा अर्थलाभ होत असतो. नोकरदारांना या सर्व सोयी जनतेच्या करातून शासनास मिळणाऱ्या लाभातून मिळत राहतात. पर्यायाने संघटित व सुरक्षित नोकरदारांना मिळणारा लाभ हा जनताच देत असते. शासन व्यवस्था फक्त माध्यमाचे कार्य करते. शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत, राष्ट्रीयकृत, राज्य, केंद्र सरकारची कार्यालये, बँका, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, नगरपरिषदा, जिल्हापरिषद व तत्सम कार्यालय, संस्था, संघटनांतील कर्मचाऱ्यांना समाजातील अन्य क्षेत्रातील तशाच स्वरूपाच्या नोकरदारांपेक्षा अधिक सेवा, सुरक्षा व स्वास्थ्य असते, हे सारे ज्यांच्या जीवावर आपणास मिळते त्या जनतेशी, जनसामान्यांशी त्यांचा व्यवहार कसा असतो? काही सन्मान्य अपवाद वगळता या सेवा सुरक्षित गटसमूहांकडून कोणती सेवा शाश्वती मिळते? काही दिवसांपूर्वी मी महानगरपालिकेकडून रितसर परवाना घेऊन नियमबद्ध बांधकाम केले. त्याचे पूर्ततापत्र हवे म्हणून मी अर्ज केला. त्यासाठी मी कर थकबाकीदार नाही म्हणून 'ना हरकत प्रमाणपत्र' मला हवे होते. मी सर्व

जाणिवांची आरास/८९