पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बापू देण्यात धन्यता मानणारे गृहस्थ! पैशांबद्दल अशी निरिच्छता मी सहसा कुठं पाहिली नाही. मागणाऱ्याला देण्यात कसली धन्यता कसली? कोण व्यक्ती, संस्था, गरजू आहे कळलं की ते स्वतः देते व्हायचे. एखाद्या संस्थेस मदत देतो म्हणलं की देईपर्यंत त्यांना चैन नसायची. मी त्यांच्या ट्रस्टचा सचिव असण्याच्या काळात पाहिलं आहे की हा माणूस कर्ज काढून देणग्या द्यायचा. एकविसाव्या शतकात दातृत्वाचे एक एक झरे वाळवंट होत असताना हे कुणाला खरंही वाटणार नाही.
  माणसाचं ‘कल्पतरू' होणं, प्रत्येक करुणेचा कल्पतरू होणं हे आगळे रसायन होतं. मी माझ्या जीवनात ‘दाता' होऊ शकलो नाही, पण देता झालो. मला जेव्हा जसं शक्य झालं तसं देत राहिलो, अशी देत राहणाऱ्यांची एक जात आहे. देते कोण होतात? जे प्रथम आपल्या जीवनात ओढग्रस्त असतात. मग ते कष्टकरी होतात. काटकसरीनं संचय करतात. बऱ्याचदा देता यावं म्हणून ते काटकसर करतात. देतात त्यात त्यांना आनंद असतो. या आनंदाच्या तळाला संवेदनेचे लक्ष-लक्ष झरे असतात. देते झाल्यानंतर त्यांना कोण ब्रह्मानंद होतो हे मी जवळून पाहिलं आहे. शां. कृ. पंत वालावलकर, शिवराम हरी गद्रे, भैयासाहेब परदेशी, प्राचार्य लीला पाटील (सृजनानंदी), डी. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, जे. के. निकम, रा. कृ. कणबरकर, आर. जे शहा अशी मला देते होणाऱ्या माणसांची फौजच फौज आठवते. अशी माणसं सांगली, कोल्हापूरच्या पंचक्रोशीत का घडतात याचा मी विचार करतो तेव्हा लक्षात येतं इथल्या मातीचाच तो धर्म आहे. लोकराज्य शाहू इथच का झाला? या साऱ्यांचं रहस्य इथल्या मातीत मिसळण्यात आहे.

***

जाणिवांची आरास/८६