पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देते व्हा, देत रहा

  शांताराम कृष्णाजी पंत वालावलकरांचा काल सहावा स्मृतीदिन अगदी साधेपणानं (खरंतर मौनपणे!) साजरा झाला. ते गेले तेव्हा समाजाने व्यक्त केलेली हळहळ माझ्या डोळ्यांसमोर दिवसेंदिवस अजून जशीच्या तशी तरळते आहे. स्मरणसाखळ्या दिवसेंदिवस क्षीण होत चालल्या आहेत हेच खरे! काल त्यांच्या पुतळ्यास व्रत म्हणून हार अर्पण करताना माझ्या मनात प्रश्न आला - 'मी हे कर्मकांड का करतो?' एकंदरच मनुष्य एखादी गोष्ट व्रत म्हणून का स्वीकारतो? यावर विचार करताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येक माणसास असं वाटत असतं की आपलं जीवन सर्वगुणसंपन्न असावं. गुणांचा गुणाकार नि दोषांचा भागाकार ही काही सोपी गोष्ट नसते. मग मनुष्य जो गुणाकार आपल्यास जमला नाही त्याची भरपाई गुणपूजेनं करत असतो. गुणांचं अनुकरण होतं म्हणून तर गुणसंवर्धन होत राहतं.
  वालावलकर माझ्या लेखी ‘करुणा कल्पतरू' होते. स्वकष्टानं मिळविलेली गडगंज संपत्ती निरिच्छ होऊन महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीने समाजास दान करणं हे बापूच करू जाणे. महात्मा गांधी काय नि वालावलकर काय - ते सर्वांचे ‘बाप' होतात म्हणून ‘बापू!' बापूंना मी वयाच्या दहाव्या वर्षी प्रथम पाहिलं. (१९५९-६०). सन २००० पर्यंत मी पाहात राहिलो. चाळीस वर्षांच्या निकट प्रवासात, सहवासात मी अनेकदा अनुभवलं आहे की त्यांना नात्या-गोत्यांतील माणसांपेक्षा समाजातील इतरेजनांबद्दल अधिक वाटायचं. ही व्यापकता हेच अशा माणसांचं मोठेपण। असतं. दुकानातील कामगारांना ते घरच्या माणसासारखे वागवत. त्यांना अधिकाधिक देण्याकडे त्यांचा कल असायचा.

जाणिवांची आरास/८५