पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोण सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांनीही आपले गणपती विसर्जित न करता दानाची भूमिका स्वीकारली पाहिजे. अशा मंडळांना स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, शासन यांनी सर्वतोपरी प्रोत्साहन, साहाय्य दिले पाहिजे.
 उत्सवातील उत्साह विवेकी असायला हवा. अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्गणी गोळा करताना खुशीची सक्ती करत खंडणी गोळा करण्याच्या पद्धतीकडे झुकू लागल्याचे लक्षात आल्यावर कोल्हापूर पोलिसांनी संचलन करून समाजास अभय देण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचे सर्वसामान्य माणसांची उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
 सार्वजनिक उत्सावांच्या वर्गणीचा वापरही विवेकाने करायला हवा. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या वर्गणीतील काही हिस्सा सामाजिक कार्यावर खर्ची करतात ही गोष्ट अनुकरणीय आहे. पण याचे प्रमाण अत्यल्प आहे. धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात पुढाकार घेऊन सार्वजनिक वर्गणीचा २५ टक्के हिस्सा समाजहितकारी कार्यास देण्याची सक्ती केली पाहिजे. चांगल्या कामासाठी सक्ती गैर मानू नये. आपल्या समाजात अनाथ, अंध, अपंग, वृद्धांचे कार्य करणाऱ्या संस्था पैशापैशासाठी धापा टाकत असताना आपण लक्षावधी रुपये रोषणाई, वाजंत्री, मिरवणूक, देखावे आदींवर खर्च करणे कितपत योग्य! याचा विचार आता नव्या मनाच्या शिक्षित व विवेकी तरुण नेतृत्वाने गांभीर्याने करायला हवा. मी स्वतः धर्मनिरपेक्ष. माझ्या घरातील अन्य मात्र धार्मिक. व्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात हे अटळ, पण आमच्या घरातील मंडळींनी उत्सवाला विवेकी व वैज्ञानिक रूप दिलं. धातूचा गणपती ते पूजतात. पूजेनंतर पुसून ठेवतात. पुढील वर्षी परत पूजतात. आमच्या घरापुरतं निर्माल्य नाही, प्रदूषण नाही. जुन्या प्रथांचं विसर्जन व नव्या प्रथांचा अंगीकार म्हणजे उत्सवांचा विवेकी प्रवास!

***

{{center |

जाणिवांची आरास/८४ }