पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उत्सव-विवेक

  भारतीय समाज उत्सवप्रिय खरा! पण उत्सवात त्याने कालपरत्वे बदल केल्याचेही दिसून येते. तसा तो पुरोगामीही राहिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गावतळी सुरक्षित राहावी, विहिरी बुजू नयेत, नद्या आटू नयेत, पाणीसाठे प्रदूषित होऊ नये म्हणून अनेक पुरोगामी कार्यकर्ते व संघटना निर्माल्य, गौरी, गणपती पाण्यात, नदीत, विहिरीत विसर्जित न करता दान करा म्हणून गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. इतक्या वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर शासनाला या प्रयत्नांचे सामाजिक व कल्याणकारी महत्त्व पटले. आता शासनानेच शाळा-कॉलेजांना परिपत्र पाठवून पाणसाठे प्रदूषित होऊ नयेत म्हणून निर्माल्य, गौरी, गणपतीचे दान करण्याचे आवाहन करून एक पुरोगामी पाऊल टाकले आहे. त्याबद्दल शासनाचे व असे समाजहिताचे प्रयत्न केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अभिनंदन! काही ग्रामपंचायती, नगरपालिका नि महानगरपालिकांनी मोठे गणपती पाणसाठ्यात विसर्जित करण्यासाठी क्रेन, दोरखंड, रक्षक, अग्निशामक दलाचे जवान न देण्याची घेतलेली भूमिकाही कालसंगत होय. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या गणपती विसर्जनात येणारी अडचण लक्षात घेऊन घडीचे गणपती बसविण्याची घेतलेली भूमिकाही मला उत्साहातले विवेकी पाऊल वाटते.
  समाजपरिवर्तन व संक्रमणाचा प्रवास पाऊल वाटेनेच सुरू होतो. काळाच्या ओघात आपणच त्याचा महामार्ग करत असतो. तो प्रवास होतो प्रत्येकाच्या घराघरातून, घराघरातील प्रत्येक सुशिक्षित, विवेकी, सुजाण माणसांनी निर्माल्य, गौरी, गणपतीचे विसर्जन न करता दान केले पाहिजे हे

जाणिवांची आरास/८३