पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे स्फुटलेखन वाचकांच्या मनी, कानी गुणगुणत राहील असा नाद त्याला आहे, हे या पुस्तक संपादनाच्यावेळी दशकभराने वाचताना लक्षात येऊन माझे मलाच आश्चर्य वाटले! (नि खरं तर हेवाही!). असं ललित, मनोहर लिहिणारा मी प्रतिभावान साहित्यिक खचितच नाही. मी नेहमी म्हणत आलो आहे की, 'मी लेखक आहे, साहित्यिक नाही.' कारण अलंकारांची आरास मला जमली नाही. माझं स्फुटलेखन हे सामाजिक जाणीव व बांधिलकीची फलश्रुती होय. लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, पुरोगामीत्व, जाती धर्मनिरपेक्ष मानवतावाद अशी पंचसुत्री घेत माझं लेखन होत राहातं.ही मूल्ये हाच लेखनाचा आधार नि लक्ष्य होय.ती दृष्टी समाजहिताच्या दृष्टीने मला महत्त्वाची नि अनिवार्य वाटते. दुसऱ्याच्या मतांची जाणीव व आदर ठेवत माझंं लेखन होत राहातं. मात्र त्यांच्या विचार सावलीत मी माझ्या जाणिवा ना ओलावू देतो ना करपू. ‘देवाचे देवाला, राजाचे राजाला' असा बायबलचा संदेश मी आचरत आलो आहे.
 स्फुटलेखन हे रकाने भरण्यासाठी मी कधीच केले नाही. लेखनाची एक उपजत असोशी माझ्यात आहे. ती मनात निरंतर रुंजी, पिंगा घालत असते.अशा निमित्ताने ते लेखन होत असले तरी नेणिवेत त्याचा नाद नित्य घुमत राहात असतो. समाजातील व्यक्ती, घटना, प्रसंग, क्रिया, प्रतिक्रिया, साद-प्रतिसाद माझे मन टिपत राहते, प्रतिक्षिप्त होत रहाते. लेखन त्याची प्रतिक्षिप्त क्रिया असते. त्यात जी उत्स्फूर्तता दिसते ती माझी उर्मी व ऊर्जा होय. ती उपजतच असते. जीवनानुभव माझी लेखन-प्रेरणा होय. वास्तवास भिडणं ही माझी जीवनशैली असल्याने तीच माझी लेखनशैली बनून अवतरते. त्यास अन्य सजावटीची गरज नाही राहात. हे लेखन एखाद्या पत्रकार, वार्ताहराप्रमाणे चौकस व चतुरस्रपणे समाजसंवेदी घटना, प्रसंग, व्यक्ती, विचार न्याहाळत, निरीक्षण करत टिपत होत राहातं. या लेखनामागे समाज बदलाची धडपड, धुंदी नि ध्यास असतो, हे मात्र खरं! शिवाय प्रश्नांना पर्याय देण्याचा संकटमोचक प्रयत्नही असतो. अन्यथा मग हे लेखन वाचले नि विसरले असे होणार. आपले लेखन ‘नळी फुंंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' असे होणार नाही हे पाहिले.
 'जाणिवांची आरास' तुम्हाला आदर्श सुचवेल. प्रतिदर्श पुढे करेल. प्रस्तुत-अप्रस्तुतातला भेद समजावून तुमचा विवेक जागवेल. तुम्हास हे लेखन सोशिक बनवेल. सहिष्णुता रुजायची तर सोशिकता हवी. परकाया प्रवेश प्रवृत्तीतूनच सामाजिक सहिष्णुता जन्मत असते. या लेखनात थरकाप नसेल पण शहार जरूर. कारण कृतिप्रवणता ही मी लेखनाची पूर्वअट मानत