पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केलं. कुलगुरूंनी विश्वासात घेऊन ते प्राध्यापकांच्या लक्षात आणून दिलं. चर्चासत्रे, परिषदात फिरणाऱ्या सिंदबादी शिक्षकांना लगाम बसला. कर्मचाऱ्यांच्या कामाचंही मूल्यमापन झालं. परीक्षा व निकाल वेळेवर पार पाडणारं एकमेव विद्यापीठ असा लौकिक अखिल भारतात पसरला. विदेशी विद्यापीठांशी करार झाले. पेटंटची कल्पना रूजली. कोल्हापुरी गूळ, चप्पल, दागिन्यांचं संशोधन, विक्रीपासून ते पर्यटनापर्यंत विद्यापीठ विचार करू लागलं. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' योजना सुफळ संपूर्ण झाली. मोरांचे अभयारण्य होऊ घातलेल्या विद्यापीठात माणुसकीचा दरवळही सर्वत्र पसरू लागला. वडणग्याचा मुलगा पण लॉगऑनच्या गप्पा करू लागला.
  इतकं सारं एक माणूस बदलण्यानं घडलं. ही खचितच आनंदाची गोष्ट होय. भारतीय समाजजीवनात व्यक्ती बदलली की संस्थेचा चेहरा बदलतो ही गोष्ट सार्वत्रिक अशी, तशी सार्वकालिकही राहिली आहे. व्यक्ती म्हणूनच तिचं कार्य गौरवाचं खरंच! मला या निमित्तानं असं सुचवावंसं वाटतं की, माणसं, यंत्रणा तीच असताना माणूस बदलला की संस्थांचे चेहरे का बदलतात? याचा विचार व्हायला हवा. (संशोधन नको.) संस्थांची घडण, कार्यपद्धती, विकास प्रक्रिया महत्त्वाची मानून अशी कार्यसंस्कृती नि शैली रुजावी की तो माणूस बदलला तरी ती कायम राहावी. विद्यापीठाचा कारभार सुदैवाने कायदा, नियम, अधिसभा, विधी सभा, विद्वत सभा, व्यवस्थापन मंडळ, अभ्यास मंडळ अशा अनेकविध सामूहिक प्रयत्नांचा गोफ आहे. असे असताना माणूस बदलला की संस्थेचा चेहरा का बदलावा, तो चांगल्या अर्थाने कायम का राहू नये? परंपरा, गौरव, विकास आदींचा चेहरा कायमचा का होऊ नये? चूक कशात आहे? व्यक्तीत, संस्थेत, समाजात की आपल्या मनात?

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद (उद्देश) नहीं है,
मेरी कोशीश है की, यह सूरत बदलनी चाहिए।'

- दुष्यन्तकुमार

***

जाणिवांची आरास/७८