पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


व्यसनी पालक, घराची वाताहत, शिकण्याची दुर्दम्य इच्छा. पैसे नव्हते, पण प्रवेश हवा होता.
 नूरजहाँ झोपडपट्टीत राहते. वडील सेंटिंगचे काम करतात. कॉलेजात जाणारी ती तिच्या वस्तीतली पहिली मुलगी. अवघे पंचवीस रुपये मुश्किलीने तिने जमवून आणलेले. कॉलेजची फी पाचशेच्या घरात. आकडा ऐकून तिला भोवळ यायची तेवढी राहिलेली.
 सुषमा नि राधा एकाच घरातील दोन बहिणी. दोघींना शिकवायची पालकांची इच्छा, पण कसंतरी जमवून एका मुलीची फी भरू शकू म्हणून दाताच्या कण्या करणारे तिचे पालक म्युनिसिपालटीत झाडू कामगार !
 रमेश उस्मानाबादहून आलेला. इथे नोकरी करून शिकणार होता. आला तेव्हा वाटखर्चाइतकेच पैसे घरातून भांडून घेऊन आलेला. माझ्याकडे प्रवेश नाही म्हटल्यावर त्याचं अवसान गळालं. त्याची अस्वस्थता, त्रेधा पाहून विचारलं तेव्हा म्हणाला, ‘प्रवेश राहू द्या सर, परतीचं पैकं बी न्हाइयात!'
 असे कितीतरी अस्वस्थ प्राजक्त मी अनुभवले तेव्हा या देशाचं एक भीषण वास्तव माझ्या लक्षात आलं. आपला देश २०२० सालापर्यंत जगातील महासत्ता बनणार आहे. आपल्या देशाची महासत्ता कोणत्या क्षेत्रात असू शकेल याचा विचार करता करता लक्षात येतं की लोकसंख्या, दारिद्रय, विषमता, निरक्षरता याच क्षेत्रात आपली अजेय महासत्ता असणार. हे सारं चित्र बदलायचं तर आपण नियोजनाकडे (केवळ कुटुंब नियोजनाकडे नव्हे!) लक्ष द्यायला हवे; अन्यथा मुंबईचाच नाही, भारताचा समुद्र झाल्याशिवाय राहणार नाही. आज देशास हवे आहे, देशास घेरलेल्या लोकसंख्या, दारिद्रय, विषमता, निरक्षरता, अव्यवस्था, अनास्था, नि अस्वस्थतेचा समुद्र हटवणारे नवे अगस्ती!

***

जाणिवांची आरास/६८