पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९.‘समानतेचं अधिराज्य घेऊन येणारं वर्तमान शतक गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा, स्त्री-पुरुष असे भेद गाडणारं नि सहअस्तित्वाचं शतक असल्याने प्रत्येकाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खांद्यास खांदा लावून चालण्याचा छंद जोपासला पाहिजे.
१०. एकतंत्राकडून लोकतंत्राकडे अग्रेसर होणाऱ्या या शतकाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याची सहिष्णुता निर्माण करणारे असल्याने परमत सहिष्णुतेची भावना आपणात वाढायला हवी.
११. एकविसावं शतक हे सामाजिक न्यायाचं शतक असल्याने सर्वांचा सर्वदिशी सर्वोदय हे आपलं ध्येय हवं.
१२. मानव अधिकाराच्या एकाधिकाराचं साम्राज्य निर्माण करणाच्या नव्या शतकात आपण उदारमतवादी होणं आवश्यक आहे.
१३. जगाकडे केवळ स्वतःच्या दृष्टीने न पाहता दुसऱ्यांच्या बाजूनेही जग पाहायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे मग आपणास विश्वरूप दर्शन होईल.
१४. एकविसावं शतक भौतिक संपन्नतेचं! तुम्ही तुमच्या पाल्यास सर्व काही द्या. फक्त तुमचे विचार नि स्वप्नं तेवढी देऊ नका. लक्षात असू द्या. तुमचे पाल्य स्वतःचे विचार नि स्वप्न घेऊन जन्मली आहेत.
१५. लक्षात असू द्या हात मागण्यासाठी नसतात तर निर्मिण्यासाठी. सतत नवनिर्मितीचा ध्यास व ध्येय उरी बाळगा.
१६. आत्मकेंद्रिततेचा शाप घेऊन जन्मलेल्या या शतकाचा पराभव करायचा तर माणुसकीचा छंद जपायलाच हवा.
१७. अवकाशवेधी या शतकात तुमच्या आकांक्षाही अवकाशस्पर्शी हव्यात.
१८. यंत्रांचे साम्राज्य होऊ पाहणाऱ्या एकविसाव्या शतकात सर्वाधिक किमती गोष्ट कोणती होणार असेल तर ती आहे मनुष्यसंवेदी कार्य! म्हणून तुमचा ‘संवेदन सूचकांक' सतत चढता असायला पाहिजे.
१९. पर्यावरण रक्षणाचे शिवधनुष्य पेलाल तर पृथ्वी परत ‘अमृतभूमी' होईल.
२०. निसर्ग संपन्नतेच्या ऱ्हासमान शतकात गरज आहे विवेकी नि काटकसरी जीवनशैलीची. प्रत्येक क्षणी दोनदा विचार करा नि निसर्ग जपा.
२१. लक्षात असू द्या, माहिती नि ज्ञान, विस्तार नि विकास यात फरक असतो.

***

जाणिवांची आरास/६४