पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चांगला प्रतिबंध बसू शकेल. आणखी एक गोष्ट छायाचित्रांसंदर्भात बरेच दिवस माझ्या मनात आहे.
  सभा, समारंभात अलीकडे छायाचित्रकार, व्हिडिओ शुटिंगवाले कॅमेरामन आदींची गर्दी वाढत आहे. समारंभाच्या मुख्य क्षणी प्रेक्षक व समारंभ क्षण यामध्ये छायाचित्रकार जी चीनच्या भिंतीसारखी अभेद्य फळी उभी करतात, त्यामुळे कार्यक्रमाच्या मूळ हेतूचाच पराभव होतो. पूर्वी कॅमेरे साधे होते. छायाचित्रकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. त्यावेळी ते समारंभाच्या मुख्य क्षणाचा फोटो चपखल टिपायचे. अलीकडे छायाचित्रांकन करणारे कॅमेरे खरं तर अधिक संवेदनशील व सुविधाजनक आहेत. त्यामुळे पाहुण्यांना पोझ घ्यायला लावायची गरज नाही, पण छायाचित्रकारांचे योग्य प्रशिक्षण नसणे, कॅमेऱ्याची साद्यंत माहिती नसणे यामुळे हे घडते असे मला वाटते.
 तीच गोष्ट समारंभाचे औचित्यपूर्ण छायाचित्र प्रकाशित करण्याचीही. समारंभ असतो शिबिर, स्नेहसंमेलन, रक्तदान आदींचा. फोटो छापला जातो पाहुण्यांचा. पाहुण्यांचे महत्त्व खरे. पण तो कार्यक्रम ज्यांच्यासाठी असतो त्याचा, उपक्रमाचा, कार्याचा (कार्यक्रमाचा नव्हे) फोटो छापण्याचं तारतम्य आपण बाळगायला हवे. यासंदर्भात संपादक महोदयांनी अधिक लक्ष घालायला हवे. वाढत्या दुर्लक्षामुळे, दादा, अण्णा, बाबा, भाई, महाराज, खंबीर नेतृत्व, समर्थ साथी, पाठिंबावाले, ब्रदूक मंडळाचे थोर, खुर्द सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणमहर्षी, चेअरमन यांच्या छायाचित्रांची चलती सामाजिक तारतम्य नष्टप्राय होत चालल्याचेच संकेत नाही का देत ?

***

जाणिवांची आरास/६२