पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.पायाखाली आणण्याचा त्याच्या मनातील हव्यास त्याला थांबू देत नाही. संपत्ती, सत्ता, संकटं, संग्रह, संभोग, संमोह, संशयादी सप्तविकारांनी ग्रासलेला मनुष्य! आज त्याला संस्कार, संयम, अपरिग्रह, अहिंसा, अस्तेयादि एकादश व्रते नव्याने शिकण्याची गरज आहे. गरज आहे गती नि गरजा कमी करण्याची. तोच सदासुखी जीवनाचा खरा राजमार्ग आहे. मृगजळामागे धावणारा आजचा माणूस कांचनमृगाची शिकार करण्याच्या मोहात स्वतःच शिकार होत आहे, असं सर्वत्र दिसतं.
 हे लक्षात घेता आज इतकं तरी आपणास करता येईल का? माझ्या खिशातल्या माझ्या पैशातला एक पैसा, रुपया निरपेक्ष सहाय्यार्थ मी खर्च करीन. खरेदीपूर्वी क्षणभर विचार करीन - आज हे घ्यायलाच हवं का?
  वेळेची थोडी काटकसर करून, स्वतःच्या कामाचा क्रम बदलून थोडावेळ शक्य असेल तर कुणाच्या तरी उपयोगार्थ घालवता येईल? मी नि माझं यापलीकडे त्याचा, तुमचा, दुसऱ्याचा, समाजाचा, क्षणभर विचार करता येईल का? असं झालं तर आजचं ‘गुड मॉर्निंग' हे ‘सोशल गुडविल' म्हणून विकसित होईल. ती उद्यासाठीची चिरंजिवी गुंतवणूक ठरेल. गती नि हव्यासाच्या कस्तुरीगंधाची नशा उतरायची तर स्वतः पलीकडे पाहणं, थोडं थांबणं हाच एकमेव रामबाण उपाय होय. पहा तरी प्रयत्न करून 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती!'

***

जाणिवांची आरास/५६