पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुहेरी संवेदनेचे आव्हान

  जिवंतपणीच आख्यायिका बनलेला एक अमेरिकन विज्ञानलेखक आहे. आयमॅक अॅसिमोव्ह त्याचे नाव. त्यानी फक्त ४८६ पुस्तके लिहिलीत. त्याच्या कादंबरीवर आधारित एक चित्रपट मी काही दिवसांपूर्वी पाहिला होता. परवा परत पाहण्याचा योग आला.'बायसेंटीनिअल मॅन' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. स्टार मुव्हीवर तो लागतो. परत लागल्यास अवश्य पाहा.
 अॅसिमोव्हनं या चित्रपटात माणूस नि यंत्राचं सुंदर द्वंद्व चित्रित केलंय. साधारणपणे २०० वर्षानंतर यंत्रावर अवलंबून राहणाऱ्या माणसापुढे काय वाढून ठेवलं असेल याचं चित्रण या कथेत आहे.एक शास्त्रज्ञ असतो.तो यंत्रमानव बनवत असतो. तो बनवत असलेले यंत्रमानव इतरांच्यापेक्षा वेगळे असतात.ते विचार करू शकतात,त्यांना संवेदना असते, दुसऱ्याला आपलंसं करण्याची नि आपण दुसऱ्याचं होण्याची त्यांच्यात क्षमता असते.त्यामुळे त्याचे यंत्रमानव ज्या घरी जातात त्या घरचे ते होतात.इतकेच नव्हे तर यंत्राच्या माणूस बनण्याने घरात,घरातील माणसांपुढे नि खुद्द त्या यंत्रमानवाच्या जीवनातही विलक्षण प्रश्न निर्माण होतात.
 त्यातील काही प्रसंग लक्षात राहण्यासारखे आहेत. चित्रपटातील यंत्रमानव ज्या घरात जातो, तिथे एक तरुण मुलगी असते. तिच्यात तो गुंततो, पण माणूस होऊ शकत नाही. अगदी छोटी घटना. मैत्रीण त्याला विचारते काय घेणार - चहा, सरबत, वाईन? तो म्हणतो, मला पोट कुठे आहे? या नि अशा प्रसंगातून अॅसिमोव्हनं यंत्राचा माणूस बनणं अशक्य असल्याचं जसं स्पष्ट केलं आहे तसंच माणसाचं यंत्र बनणंही कठीण !

जाणिवांची आरास/४९