पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 कारण सध्याचं गुजरात सरकार साबरमतीच्या किनारी काँक्रिट रोड, रेल्वे, बझार अशा अत्याधुनिक सुविधांसाठी जेसीबीज, बुलडोझर्स, रोडरोलर्स फिरवत आहे. सर्वांना जागतिकीकरणाच्या स्वप्नांनी पछाडलं आहे. त्यात गुजरात भारताची व्यापार राजधानी. इंडिया ट्रेड सेंटरचं रूपांतर इंटरनॅशनल वर्ल्ड सेंटरमध्ये होईल तेव्हा त्याच्या प्रवेशद्वारावर महात्मा गांधींचा पुतळा, त्यांचा चरखा असेल... हे वाक्यही असेल... 'मेरा जीवनही मेरा संदेश है।' पण महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत तेव्हा असणार का, हा खरा प्रश्न आहे.
 गुजरात विद्यापीठाच्या कोपऱ्यावर रिक्षा केली नि त्याला म्हटलं,‘महात्मा आश्रम' ले चलो!'तसं त्यानं विचारलं, “कौनसा महात्मा !' मी म्हटलं, 'बापू कुटी भाई!' तो म्हणाला, “यहाँ दो बापू है - एक गांधी बापू और दुसरा आसाराम बापू!' त्याचे विचारणं त्याच्या जागी बरोबरच होतं... एक महात्मा, बापू गेल्या शतकातला... एक या क्षणाचा! मला उगीचच आइनस्टाइन आठवला... तो म्हणाला होता... पुढच्या शतकात कुणाला खरंच वाटणार नाही की, असा गांधी होऊन गेला...मी चक्रावून गेलो हे सारं ऐकून...पाहून अन् लक्षात आलं की,साबरमतीचं मूळ शब्दरूप बहुधा सब्र मति (संयमी बुद्धी) असावं... मी हे सारं संयमानं, शांतपणे ऐकत, पाहात परतलो.

***

जाणिवांची आरास/३६