पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आज पहली तारीख है

आज तरुणाई जशी रेडिओ मिरचीवर फिदा असते तशी आमची तरुणाई त्या काळात रेडिओ सिलोन, विविध भारतीवर असायची. त्या वेळी या स्टेशन्सवर एक तारखेला एक गाणं हमखास लागायचं... खुश है जमाना आज पहली तारीख है'. किशोरकुमारनी गायलेलं हे उत्साही गाणं लागलं की तमाम नोकरदार वर्गाच्या कळ्या फुलून यायच्या. मी मिळवत नव्हतो तेव्हा या गाण्याचा ताल मला विलक्षण भावायचा. जेव्हा मी मिळवू लागलो तेव्हा या गाण्यातील महिन्याच्या विरहानंतर दिसणाऱ्या पैशाच्या आशेने मीही हरकून जाऊ लागलो.
 या एक तारखेचं नि नोकरदारांचं जवळचं नातं असतं, पण त्यासाठी तुम्ही मध्यमवर्गीय, मजूर, नोकर असण्याची पूर्वअट असते मुळी. पूर्वी नोकरदारांचे पगार मालकाच्या लहरीवर व्हायचे. एक तारखेच्या पगाराची दिवाळी अनुभवावी सरकारी नोकरांनीच. एक तारखेला रविवार आला तर यांची दिवाळी व्हायची ३० तारखेलाच. केवळ एवढ्याच एका कारणासाठी अनेक वधू पित्यांनी आपल्या मुली सरकारी नोकरांना दिल्या. त्यामुळे नियमितपणे अनियमित तारखेस पगार होणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकांना सरकारी नोकरांबद्दल कायमचा हेवा वाटत राहायचा.

 आमचा पगार तर ‘लांडगा आला रे आला' म्हणत आठवडाभर आवईवरच असायचा. बातमी यायची. आज पगार होणार. मग कळायचं संस्थाचालकांची चेकवर सही झाली. मग एक दिवस कळायचं की पैसे आणलेत, पण पाकिटं करायची राहिलीत. पाकिटं झालेल्या दिवशी हमखास हेडमास्तर कुठल्यातरी वर्दीवर गेलेले असायचे. अशा लांडग्याप्रमाणे

जाणिवांची आरास/३१