पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.  हा पण फिका वाटावं असा अनुभव मला परवा आला. असेच स्वेच्छानिवृत्त एक प्राध्यापक मला परवा बँकेत भेटले. माझ्याकडे पेन नव्हतं. म्हणून त्याच्याकडून सहीपुरतं पेन घेतलेलं. स्वारी समोरची काही हलेना. मी पेन परत दिला तेव्हा कुठे स्वारीचा जीव भांड्यात पडला. म्हणाले, 'अहो सिल्व्हर पेन आहे. व्हीआरएसमधून घेतलाय' पेनशिलीवर असलेले रामूतात्या कुठे नि हे ‘पेन सिल्व्हर प्राध्यापक' कुठे.यावरून मला आठवले आमच्या संस्थेतील आयुष्यभर अनाथांची शुश्रुषा करून रिकाम्या हातांनी निवृत्त झालेले जाधवमामा. पदरात तीन मुली घेऊन निवृत्त झालेले जाधवमामा पेन्शनसाठी खेटे घालत मरून गेले, पण पेन्शन काही मिळाली नाही.
 असं आपल्याकडे का? एकाला पेन्शन नाही, एकाला अपुरी, एकाला गरजेपेक्षा अधिक, तर एकाला छप्पर फाडके! पेन्शन असलीच पाहिजे, पण ती सर्वांना ज्याच्या त्याच्या गरजा भागवणारी नको का? मी ऑस्ट्रियात असताना मला एक व्हिक्टोरियावाला (टांगेवाला) भेटला होता. तिथे सहा महिने बर्फ पडतो तेव्हा व्हिक्टोरिया बंद पडते. तेथील सरकार हिवाळ्यात व्हिक्टोरियावाल्यांना दोन पेन्शन देते. एक घोड्यासाठी तर दुसरी व्हिक्टोरियावाल्यांसाठी. तेथील सरकार असा विचार करते की, घोडा जगला तर माणूस जगणार. आपण माणूस जगवणारी तरी पेन्शन नको का द्यायला? शेतमजूर, खासगी नोकरदार यांचे वाली कोण? संघटितांनी संघटितपणे सर्व सिस्टीमॅटिक मिळवायचं नि असंघटित म्हणून अन्य नागरिकांनी लाजिरवाणं जगायचं हा कुठला न्याय? एकविसाव्या शतकात जात, पात, संघटन इत्यादी पलीकडे जाऊन सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर साधनांची वाटणी नको का व्हायला?

***

जाणिवांची आरास/३0