पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वीस किलोमीटरला इथं सहज एक तास लागतोच लागतो. कॉलेजीस आहेत, पण शिक्षकभरती नाही. सहा महिने पगार नाही, तर खर्चाचं अनुदान नसल्यानं सायन्समध्ये प्रैक्टिकल्स होत नाहीत. पदवी वर्गात दोन-तीन, फार तर पाच विद्यार्थी, प्राथमिक शाळांची दुरवस्था विचारायलाच नको. गेल्या वीस वर्षांत बिहार ५० वर्षे मागे गेल्याची भावना सर्वत्र आहे. पण बिहारी जनता अज्ञानी असल्यानं मोठी सोशिक आहे. इतिहासात रमणं, तक्रारींचे सूर आळवत आयुष्य काढणे इथला स्थायिभाव आहे. गतिमानाची गोष्ट फक्त पाटण्यातच.
 एकेकाळी विचारांची बैठक लाभलेला बिहार आज भारतीय प्रशासन व्यवस्थेत मोठी कामगिरी करताना दिसतो. सामान्य बिहारी आजही कुशाग्रबुद्धीचा असल्याचं लक्षात येतं. असं असताना ही दुरवस्था का? याचा विचार करता लक्षात येतं की, येथे जमीनदार व मजूर यांच्यातील अंतर इतकं आहे की, सोसण्याशिवाय बिहारी जनता काहीच करू शकत नाही, अशी अगतिकता येथील राजकीय इतिहासांनी निर्माण केली आहे. आज प्रजासत्ताकदिनी हे वास्तव मला अधिक अस्वस्थ करते. तुम्हास?

***

जाणिवांची आरास/२२