पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बिहारी सोशिकता

 एका शैक्षणिक कामाच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात बिहारला गेलो होतो. बिहार पाहायची इच्छा अनेक दिवसांची होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील दरभंगा जिल्ह्यामध्ये भूकंप निवारणाचे कार्य केले होते. यावेळी त्यांनी जमलेल्या निधीच्या पै-पै चा हिशेब समाजापुढे ठेवून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ समोर ठेवला होता. येथील चंपारण्यात महात्मा गांधींचा आश्रम आहे. सत्याग्रहाचे मूळ प्रयोग या प्रदेशांनी जवळून अनुभवले आहेत. नंतर आचार्य विनोबा भावेंनी येथे ग्रामदानाचे मोठे कार्य केले. आजही बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात ग्रामदान कार्यालये दिसतात. आणीबाणीच्या विरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी समाजक्रांतीचा संदेश दिला तो जयप्रकाश आश्रम आज पाटण्यात प्रेरणा देत राहतो. इथे लोक अजूनही खादी घालतात. महात्मा गांधींच्या साधेपणाच्या मोहातून सामान्य बिहारी जनता अद्याप मुक्त न झाल्याच्या खुणा येथील शिक्षक, प्राध्यापकांशी बोलताना लक्षात येत होत्या.

 गौरवशाली परंपरा लाभलेल्या या राज्याची वाताहत झाल्याचे मला सर्वत्र दिसून येत होते. मधेपूरसारख्या गावानं १९९० पासून वीज पाहिलेली नाही. सर्वत्र केबलसारखी जनरेटरद्वारे मासिक ७0 रुपये भाड्याने एका ४० कॅडल बल्बसाठी रोज सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत वीज पुरवली जाते. गावोगावी अजून हातपंपच चालतात. इथे रस्त्याची दुरवस्था इतकी आहे की प्रवासाचं अंतर किलोमीटरनं न मोजता ते वेळेत मोजलं जातं.

जाणिवांची आरास/२१