पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तुत की अप्रस्तुत

 मराठी भाषेत काही शब्द असे आहेत की सामान्य माणसास ते सहजासहजी समजत नसतात. अशांपैकी एक आहे ‘प्रस्तुतता'. सोप्या भाषेत जे सांगता येतं त्याऐवजी साहित्य, समीक्षा प्रांतातील विद्वत मंडळी कठीण शब्द का वापरतात हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्रस्तुतता' या शब्दास हिंदीत मात्र सुलभ शब्द आहेत - प्रासंगिकता, सरोकार आदी. हे सगळं आठवायची अनेक कारणं या आठवड्यात घडली. शिवाजी विद्यापीठात 'एकविसावे शतक व खांडेकरी साहित्याची प्रस्तुतता' विषयावर परिसंवाद झाला. तिथे आजच्या काळात खांडेकर साहित्य कितपत लागू आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला. तिकडे पुण्यात मराठी साहित्यिक अनिल अवचट यांना ‘डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी जागतिकीकरणाच्या प्रस्तुततेविषयी डॉ. अनिल अवचट व डॉ. वसंत गोवारीकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली.

 व्यक्ती, विचार व व्यवहाराची चर्चा खरं तर त्या-त्या काळाची परिस्थिती, गरज, आवाहने यांच्या संदर्भात व्हायला हवी. भाषेच्या अलंकारिक पोताचे आकर्षण स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसात होतं. कारण इंग्रजी आमदानीच्या काळात इंग्रजीपेक्षा भारतीयास स्वभाषेची अनिवार ओढ असायची. तो काळ सुधारणेचा होता. ध्येय, ध्यास, आदर्श त्या काळाची गरज होती. वि. स. खांडेकरांच्या साहित्यात ती शक्ती होती. त्याची मोहिनी त्या पिढीस पडणे यात गैर काहीच नव्हते. म्हणून काही आज खांडेकर एकदम कालबाह्य ठरत नाहीत. त्यांचे साहित्य सदैव प्रस्तुतच

जाणिवांची आरास/१९