पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्याच्या पदरी येते. ‘तेच ते' चा कंटाळा रोजचा. रोज मनास दगड बनवण्याचीच समजूत घालणारे विंदा. त्यांच्या लेखी ‘साम्यवेद' हा पंचम वेद असतो. सावल्यांचा माग काढत जाणारे विंदा उपासक होतात ते त्यांच्यातील जाज्वल्य मूल्यनिष्ठेमुळे. भूत नि भविष्य एकाचवेळी थरारत जगणारा हा कवी.त्याची जातकुळीच वेगळी! त्यांच्या निर्जीव मनात सृजनशील बीजे अंकुरतातच कशी याचं आश्चर्य वाटावं असा सारा आसमंत, पण तो असतो चैतन्यरथातला बंडखोर आत्मा. ' वेदनेला अर्थ दे रे' म्हणून प्रार्थना करणारा हा कवी. तो सुखाच्या धुक्यात कधी वाट हरवत नाही की दुःखाचा गहिवर कधी त्यास आक्रस्ताळा करत नाही, हेच त्याचं मोठेपण. त्याच्या प्रत्येक शब्दांना मृद्गंध असतो. प्रत्येक ओळीत आग वाहात असते. त्याच्या अर्थात समाजाचे सारे ताणतणाव आपसूक भरलेले असतात. खादीचा कुर्ता, पायजमा घालणारा हा कवी आतून-बाहेरून एक असतो. हेच त्याचं खरं महात्म्य! शब्दांचं सोनं होवो अथवा माती, त्यानं धृपद लिहिण्याचा छंद टाकला नाही. म्हणून ज्ञानपीठ त्यांचा गौरव करते, हे समजून घ्यायला हवं. या क्षणी त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्याच ओळीत तुम्हास सांगावं वाटतं -
 ‘जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता।

 ऐसा योग आता| पुन्हा नाही।।'

जाणिवांची आरास/१८