पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देतात. प्रतिवर्षी महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमांना लाखो रुपयांची मदत करतात. मला त्यांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं की माणसांचं जगणं स्वतःसाठी असतं, तसंच ते समाजासाठीही असायला हवं. तरुणपणात स्वतःसाठी जगण्याचा कैफ अंमळ असतो. ज्यांना भर जवानीत जगण्याची जिद्द गवसते ती माणसे काही करून दाखवू शकतात. काही करून दाखवण्याची उर्मी माणसात येते, ती जीवनाच्या अडचणी नि संघर्षातून. जगण्याचा कैफ उतरल्यानंतर तरी समाजासाठी नको का काही करायला? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे मिळवतो त्यात समाजाचाही वाटा असतो. केवळ व्यक्तिगत श्रमातून फार कमी हाती येतं. म्हणून जे हाताला लागतं ते भरभरून देण्यातील सार्थकता माणसाने अनुभवायला हवी. सार्थकतेचा अर्थ सांगणारी डॉ. लाभेटवारांसारखी माणसं भेटली की मला 'ज्वाला आणि फुले' मधील बाबा आमटेंच्या या ओळी आठवतात- 'यातनाहीनांना स्वप्ने नसतात आणि जो थोडे सहन करतो तो थोडेफार करू शकतो जो खूप सहन करील त्याला पुष्कळ काही करून दाखवता येईल.'

◼◼

जाणिवांची आरास/१६