पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 प्रभावी व आतून पोखरलेले असते, हे आता कालौघात लक्षात येऊ लागले आहे. ती अभिजात संस्कृती पूर्वीही नव्हती, आजही नाही. केवळ बहुजन नव्हे तर सर्वजन हितकारी संस्कृती खरी आदर्श संस्कृती.
 कालपरत्वे सरंजामी, माध्यम, सिनेमा, दूरदर्शन, फॅशन, प्रादेशिक आदी संस्कृती उदयास आल्या. या संस्कृतींचा एककलमी कार्यक्रम आहे, ‘सब घोडे बारा टक्के करायचे. म्हणजे काय तर आपल्याला हवी तशी माणसं घडवायची. पूर्वी माणूस विचार करायचा म्हणे! का तर तो वाचायचा. नव्या संस्कृतींनी माणसाचं वाचन तोडलं ते त्याने विचार करू नये म्हणून.आपली पुढची किंवा त्याही पुढची पिढी पहा. ती सक्तीच्या क्रमिक पुस्तकांशिवाय काही वाचत नाहीत. तिला नुसतं नव्या संस्कृतींनी ‘सुशेगात केले आहे. खाओ, पिओ और मजा करो!' त्यांना पत्र लिहिता येत नाही, आपुलकीनं बोलता येत नाही. कुणाच्या घरी जायचं म्हणजे अंगावर काटा. नातेवाईक एकतर बारशाला येतात, नाहीतर बाराव्याला. तेही हाताची घडी नि तोंडावर बोट, तेरी भी चूप और मेरी भी! झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडली तर फुकाची.
 सभ्यता म्हणजे आपलेपणा. सभ्यता म्हणजे नम्रता. सभ्यता म्हणजे दुस-याचे कोणीतरी आपण होणे, असणे. सभ्यता म्हणजे सुसंस्कृतता, सहिष्णुता. सभ्यता म्हणजे द्वेषमुक्ती व परमताचा आदर, सद्भाव, सभ्यता म्हणजे परकाया प्रवेश. आपल्याला जे हवं असतं, ते दुस-यालाही मिळालं पाहिजे अशी जाणीव व भावना. सभ्यता म्हणजे आपपर भेदातीतता. ‘फायर ते फ्राइड' असा माणसाचा विकास म्हणजे भौतिकापेक्षा भावनेच्या ओलाव्याचा आलेख उंचावणं व ओलाव्याचा प्रदेश रुंदावणं. स्त्री-पुरुष अंतर मिटून दोन्ही माणसाचीच रूपे आहेत असे समजून वागणे, बोलणे, विचार करणे. त्यासाठी तुमचे सेलिब्रेटी कोण हवेत? राजकारणी, नट-नट्या की साहित्यिक, कलाकार, समाजसेवी? जो समाज वाचतो, लिहितो, विचार करतो तो प्रगल्भ-सभ्यता जन्माला घालतो. प्रबोधनपर्वात युरोपात अशी सभ्यता निर्माण झाली. आपल्याकडे त्यानंतर समाजसुधारणा घडून आल्या. त्या सर्व आपण हरवून बसलो आहोत, ते सभ्यतेस आपण तिलांजली दिली म्हणून.

जाणिवांची आरास/१६८