पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





        गोव्याचे एक प्रसिद्ध भाषांतरकार ८२ वर्षांचे सुरेशबाबा गुंडू आमोणकर. कोकणी भाषेत ते हिंदू-ख्रिस्ती धर्माचे व इंग्रजी, संस्कृत, मराठी, कोंकणीचे समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी फादर स्टीफन कृत 'ख्रिस्तपुराण' चा नुकताच कोंकणीमध्ये अनुवाद केला आहे. त्याची पृष्ठे १०७० आणि वजन सहा किलो. यापूर्वी त्यांनी धम्मपद, श्रीमद् भागवत, तिरुकुळ्ळकर, झेन कथा, जपुजी साहब अशा बौद्ध, हिंदू, शीख धर्मग्रंथांची तसेच तमीळ, चिनी साहित्याची कोंकणीमध्ये भाषांतरे केली आहेत.
       जग हे निसर्गाचे प्रतिबिंब आहे. निसर्ग हा अनेक रंगांनी भरलेला म्हणून इथली प्राणिसृष्टी बहढंगी. इथे डायनासोर-अमिबा असतो नि हत्ती-मुंगीपण! इथे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अस पंचतत्त्व मीलन पाषाण युगापासून नातं आहे. दिवस-रात्र षड्ऋतू यांचा जीवनक्रम अद्याप कोणी बदलू शकला नाही. म्हणून जगात सांस्कृतिक वैविध्य दिसून येते. मानववंशशास्त्र असे सांगते की वंश-वैविध्य हे निसर्ग प्रभावी परिमाण नि परिणाम होय. भाषा, रंग, रूप, सण, रूढी, परंपरा वैविध्य म्हणून जग सुंदर! या सुंदर जगास आपल्या लहरींनी एकरंगी, एकदंगी करण्याचे प्रयत्न इतिहासात कमी का झाले? तलवारीच्या बळावर सारं जग इस्लामी बनवण्याची आकांक्षा इथे हरली. धर्मातरांनी सर्व जग ख्रिश्चन करण्याचे मनसुबे ब्रिटिशांना मनातल्या मनात गिळावे लागले. भारताचा परत हिंदुस्थान' करण्याचे मनोरथ हा या क्रमाचाच भाग असला तरी भारत हा पूर्वापार बहुधर्मीय, बहुवंशीय, बहुसांस्कृतिक देश राहिला आहे. तो पूर्वीपासून इथल्या उपजत संपन्नतेमुळे ह्युआन सांगचं जसं आकर्षण होता, वास्को-डी-गामाला पडलेली भारताची भुरळही तशीच होती. फ्रान्समध्ये नुसती ट्युलीपची फुलं नि भारतात फक्त कमळ फुलेल, असं होणार नाही. चीनचं आकाश पिवळे नि पाकिस्तानचं हिरवं असं नाही घडणार. जोवर माणूस 'माणूस' राहील तोवर त्याला विश्वबंधुत्व, सहअस्तित्व, समन्वय, सहिष्णुता यांची तहान व ओढ लागणारच आणि ती कोणी थांबवू शकणार नाही, कारण तिचा उगम निसर्गाच्या वैविध्यात आहे.



                           जाणिवांची आरास/१६०