पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सार्थकता

 काल अमेरिकेत स्थायिक असलेले माझे भारतीय मित्र डॉ. अनंत लाभसेटवार भेटले नि मला परत एकदा जगण्यातील सार्थकता नव्याने उमजली. नागपूरजवळच्या दारव्हा गावी त्यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. ते परिस्थितीशी झगडत इथे बी. एस्सी. झाले. एम. एस्सी. साठी त्यांची अमेरिकेला निवड झाली. अमेरिकेस जाताना विमानाच्या तिकिटाएवढे पैसे नसल्याने ते बोटीने अमेरिकेस गेले. बोटीने जातानाही पॅसेंजर बोटीऐवजी ते मालवाहू बोटीने गेले. कारण ती पॅसेंजर बोटीपेक्षा स्वस्त असायची. महिनाभरचा प्रवास. वर डेकवर अमेरिकन पाव-लोणी खायचे. त्यांना तळघरात इटलीच्या उकड्या तांदळाचा भात व सूप मिळायचं. अमेरिकेत जाऊन त्यांनी श्रमाची अनेक कामे केली व बोटीच्या प्रवासासाठी वडिलांनी काढलेले कर्ज फेडलं. अपार अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळविली. एम.एस्सी.तर झालेच पण पुढे पी.एचडी. ही!

 असा हा माणूस आज अमेरिकेत स्वतःची बँक असणारा पहिला भारतीय झाला. त्यानं रेडिओ स्टेशन खरेदी केलं. मॉल्स् (मोठी दुकानं) खरेदी केली. त्यांच्या घराचं आवारच मुळी पाच एकराचं. ही जमीन कमी पडली म्हणून की काय त्यांनी अमेरिकेत एक हजार एकर (हो! एक हजार एकर!) जमीन खरेदी केली. एक दिवस मनात आलं नि सारं विकून त्यांनी एक ट्रस्ट केला नि त्यातून ते दरवर्षी भारतातील लोकसंख्या नियंत्रणासाठी कार्य करणाच्या व्यक्ती व संस्थांना एक लाखाचा पुरस्कार देतात. मराठी भाषेवरचं प्रेम म्हणून श्रेष्ठ मराठी साहित्यिकास एक लाखाचा पुरस्कार

जाणिवांची आरास/१५