पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/153

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरा सहन करतो, स्वीकारतो, हे लक्षात ठेवून इतरांना सहन करा नि स्वीकारा. मग पहा, मतभेद राहिले तरी मनभेद नाही होत. तिथे शहाणपण, सामंजस्य, समन्वय नांदतो. मतभेदपूर्ण सहजीवन, सहअस्तित्व म्हणजे समाजशीलता होय.

   स्वातंत्र्याची संकल्पना एकतर्फी असू शकत नाही. स्वातंत्र्य केवळ आपलं नि दुस-याचं मानणं हा स्वार्थ झाला. सर्वांचे स्वातंत्र्य मानणे, म्हणजेच व्यापक उदारता. स्वातंत्र्य म्हणजे नुसता हक्क नाही, तर ते कर्तव्यही असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्हाला आविष्कार स्वातंत्र्य आहे; पण दुस-याच्या स्वातंत्र्याचा आदर ही त्याची पूर्वअट असते. नाही तर मग आपणास वेगवेगळ्या वनवासास तोंड द्यावे लागते. जगात सारे बदल व परिवर्तने ही स्वातंत्र्यापासून जन्माला आली आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा संकोच हा निषेधार्ह ठरतो.
  मी म्हणतो तेच खरे, अशी वृत्ती अहंकारातून जन्म घेते. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. सामाजिक जीवनात बहमताला किंमत असते. शहाणा माणूस बहुमत प्रमाण मानून एकान्त पसंत करतो. ही एकप्रकारची समाजसहिष्णुताच असते. स्वातंत्र्य हा एकाधिकार नाही. स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे समोरची व्यक्ती नि समाज. ब-याचदा घर, समाज, राष्ट्र आदींसंदर्भात कर्ता अधिकारी असतो. त्याला अधिकारपद लाभते ते कर्तव्य करतो म्हणून किंवा करेल म्हणून. ब-याचदा अधिकारपदी गफलत होते. कर्तव्यदक्ष असतानाही अन्य आकांक्षी कर्तव्यदक्षांबद्दल गैरसमज पसरवतो. सामाजिक मन माध्यमांवर स्वार असते. म्हणून माध्यमांचा विवेक आजच्या काळात महत्त्वाचा. आज जगभर सर्वाधिक नाजूक गोष्ट कोणती विचाराल तर त्याचे नाव स्वातंत्र्य !स्वातंत्र्य म्हणजे जुलूम नि गुलामीचा हास. स्वातंत्र्य लाभायला हवे. लादलेले स्वातंत्र्य कोणतीच निर्मिती करू शकत नाही. निर्मितीशून्य स्वातंत्र्य हे अपराधभाव जन्माला घालते. स्वातंत्र्य म्हणजे स्वाभिमान प्रज्वलित करणारे स्फुल्लिंग होय. स्वातंत्र्यात भय, दरारा, दहशत असता कामा नये. स्वातंत्र्य ही दुस-याच्या डोळ्यात पाहण्याची गोष्ट होय. दुस-याच्या डोळ्यात तुमची प्रतिमा सहिष्णुतेची असेल तर समजावे, या जगात मुंगीलाही अभय आहे.
             जाणिवांची आरास/१५२