पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






स्वातंत्र्य


      स्वातंत्र्य हे जीवनमूल्य आहे. ते राष्ट्र, मानव समाज अशा संघटित जीवनात जितके महत्त्वाचे, त्यापेक्षा व्यक्तिगत जीवनात त्याचे महत्त्व असाधारण! माणसाला उपजतच स्वातंत्र्य आवडते. अगदी लहान मुलांनाही. म्हणून तर आपण टीव्ही, व्हिडिओ गेम बंद करून अभ्यास कर म्हटले की त्याला राग येतो. मुले मोठी होऊ लागली की, मित्र-मैत्रिणी हे त्याचे स्वातंत्र्य असते. कारण तिथे त्यांना मन मोकळे करता येते. खरंतर मुलांना घरी मोकळा श्वास घेता आला पाहिजे. मुक्त संवाद करता आला पाहिजे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांची गोष्ट सांगितली जाते. अध्यक्ष झाल्यावरसुद्धा ते रविवारचे भोजन कुटुंबासमवेत घेत. त्या दिवशी घरचे सर्वजण उपस्थित असत. जेवणाच्या टेबलावर सर्व समान! अध्यक्ष झाल्यावर नातूसुद्धा त्यांना ‘मिस्टर हॉवर' म्हणून बोलावत असे. आधी स्वातंत्र्य, समता, बंधुता घरात नांदली पाहिजे. नंतर ती समाज नि देशात पाझरायला हवी.
     स्वातंत्र्याचा पायाच समानता आहे. घरातील स्त्री-पुरुष एकमेकांशी मनातलं बोलतात की औपचारिक संवाद राहतो, यावर घराचं घरपण अवलंबून असतं. आई-मुलगा, मुलगी-वडील, सासू-सून, मुलगी-सून हे दोन ध्रुव असतील तर तिथं स्वातंत्र्य, समता नसते. मग बंधुतेचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका निबंधकाराने घराचं घरपण बोलणे, ऐकणे नि सहन करणे अशा तीन शब्दांवर टिकून असल्याचे लिहून ठेवले आहे. मनात येणारे विचार मोकळेपणाने व्यक्त करा; पण दुसन्यास दुखवू नका. दुस-याचे उदारपणे ऐका. पटले नाही तर दुर्लक्ष करा. वरील दोन क्रियांमध्ये आपणाला


                        जाणिवांची आरास/१५१