पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




आमटेंनी ‘ज्वाला आणि फुले' मध्ये ते अधोरेखित केलं आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचे नाव! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. माशी, नाकतोडा, टोळ, पंख मुंगी हे सारे या प्रजातीत मोडतात. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड व पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही! तो रक्तहीन असला तरी रतिप्रवीण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारुण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठी जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम ‘सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. संभोग जबरी असतो. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे, मरणे नि मारणे. जगणे नसतेच.

        माणूस मे-फ्लाय होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला एटीएम जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहणे आले पाहिजेत. ते राहिले पाहिजेत. तुम्हीही इतरांच्या घरी जात-येत रहा. गतीत ते शक्य नाही, याची मला जाणीव आहे; पण गतीत उसंत शोधा. उसंत स्वतःसाठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका.
      वाचा, बोला, ऐका, लिहा, पाहा. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वतःपलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे मोजून भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या.
     खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाईल हे सारे त्या त्या काळातले आभासी भावच! माणूस भावाचा भुकेला असतो. आभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जिवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरे जगणे!
     



                          जाणिवांची आरास/१५०