पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




तुला अमर व्हायचं तर मनुष्याचा महात्मा, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी, कलाकार व्हायला हवं. नाही तर तू सामान्यातील एक.

     'काय' प्रश्नाने साच्या जगाचे रहस्य उलगडलेस. काय हवं, काय नको या विधिनिषेध विवेकाने जंगली माणसाला सभ्य, सुसंस्कृत बनवलंस. नीती, आदर्श, संस्कार, सभ्यता, संस्कृती या साच्या संकल्पनांचा उदय ‘काय' या प्रश्नातून झालेला आहे. 'कसे' आणि 'कुठे' तसे गौण प्रश्न. पण त्यांनीही स्थल, काल महात्म्य अधोरेखित केलं आहे. हे शब्द नसते तर पृथ्वीचा शोध लागला नसता. कोलंबस, वास्को दि गामा यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करून जगातले नानाविध देश, भाषा, संस्कृती, ज्ञान-विज्ञान शोधून काढले म्हणून समस्त मानव समाज निरंतर उन्नत होतोय.
    ‘कधी' या प्रश्नाने कालभान दिले. या कालभानामुळेच माणसाला गतीचा बोध झाला. गतीने सूर्यमंडळाला गवसणी घातली. गॅलिलिओ, सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, तुकाराम आणि आज डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, माणूस गती स्वीकारत नाही. फक्त तो क्षमा मागतो. असहिष्णू व्यवहार केवळ क्षमाप्रार्थनेने दुरुस्त होत नसतात. पोपच्या क्षमा याचनेपेक्षा सर्वसामान्यांचं प्रगल्भ, स्वप्रज्ञ होणं महत्त्वाचं. ‘कधी प्रश्नाला बगल देणारा समाज सदैव देववादी नि दैववादी राहिल्याचा इतिहास आहे. प्रबोधन पर्व सात समंधांचा पिच्छा पुरवत स्वतःला उसवत विवेकवादी बनवत राहते. आइन्स्टीन मोठा का? तर त्यानं जगाला सापेक्षता समजावून निरपेक्ष केलं.
    ‘किती' प्रश्न वर्तमानाचं चलनी नाणं होऊन बसलं आहे. माणसाने नाणे जन्माला घातले हा अंकज्ञानाचा गैरवापर होय. अर्थशास्त्र किती? प्रश्न विचारते. तो गरज सूचक होय. गरजेपेक्षा संग्रह म्हणजे विषमता, अत्याचाराचे मूक समर्थनच. सत्ता आणि संपत्ती दोन्ही किती शब्दाच्या पायावर उभी असते. मताच्या जागी मन आणि नाण्याच्या जागी माणूस पाहतात ते राज्यकर्ते. सर्वसंग परित्याग करणाच्या गौतम बुद्धाने जीवनातून ‘किती शब्द बहिष्कृत करत तो स्वतः हद्दपार झाला होता. 'कफनी’ आणि ‘कफन' यातलं अंतर त्यालाच समजलं. आज आपण काय पाहतो? ‘का?' या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्हीच शोधायचे.


                   जाणिवांची आरास/१४६