पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सात समंध मानेवर

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या 'मृद्गंध' कवितासंग्रहात 'हे आइन्स्टीन!' शीर्षकाची कविता आहे. तिच्या काही ओळी अशा,

    'हे आइन्स्टीन!
    'कोण', 'काय',
    ‘कसे', 'कुठे',
    'का' - असे
     सात समंध
     माझ्या मानेवर!
     हे समंध समस्त मानव जातीच्या मानगुटीवर अनादि, अनंत काळापासून

बसलेले आहेत. समंध म्हणजे भूत. भूत एकदा मानेवर बसले की उतरत नसते म्हणे! कोण, काय, कसे, कुठे, कधी, किती, का ही तशी प्रश्नात्मक सर्वनामे; पण शब्दांनी सा-या ज्ञान, विज्ञान विकासाचा पाया घातला. आपल्या भाषेत शब्दांचे अस्तित्व नसते तर आपण अद्याप अश्मयुगात असतो. माणसाला प्रश्न पडणे वा प्रश्नात माणूस पडणे यात समस्त मानव जातीचा विकास सामावलेला आहे.

     'कोण' हा प्रश्न कोऽऽहम? पासून आला. माणूस विचार करायला

लागला म्हणजे काय? तर तो अंतर्मुख झाला नि स्वतःला प्रश्न केला की, मी कोण? शोध घेता घेता त्याच्या लक्षात आले की, कालपटलाच्या अनंत प्रवासात 'मी' म्हणणारा अहंकारी मनुष्य कःपदार्थच असतो. आकाशगंगेत असंख्य तारे असतात तशी पृथ्वीतलावर असंख्य माणसे. त्यातला एक तू.


                    जाणिवांची आरास/ १४५