पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/135

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेसाधी कसोटी असली पाहिजे की मी स्वतःच्या पलीकडे पालात असलेल्या माणसासाठी काही करतो का?
 बाबा आमटे म्हणत की ‘क्रांती ही सीतेच्या पावलासारखी असते. ती हळू यायला हवी. हळूहळू घडणारी क्रांती कायमचे बदल घडवते. दुसच्याबद्दलचं जगणं, तसा विचार करणं, क्षणिक भावनिक आवेग असता कामा नये. ती एक विचारपूर्ण कृती असायला हवी. तुमच्या प्रयत्नातून बदललेल्या जगाचं हास्य दुस-याच्या चेह-यावर पाहण्याचा छंद जे लावून घेतात त्यांनाच सामाजिक कायाकल्प करता येतो.
 वेदनेचा शर नसलेले शरीर उन्मत्त होते.
 व्यथेच्या पावसात चिंब भिजून ते विशुद्ध होते.
 असं बाबा आमटेंनी एका कवितेत लिहिलं आहे. आपण नम्र, ऋजू का असत नाही तर आपणास परपीडेची फिकीर असत नाही. बाबा आमटेंचा हात तेथील अंध मुलं आपसूक ओळखायचे. ते ओळखणं त्यांच्या कामाचं तापमापक (थर्मामीटर) होतं. आपल्या आयुष्याचं तापमान मोजणारं तापमापक संवेदनासूचकांक सांगणारं होकायंत्र असून ते कुणी शोधून काढलेलं नाही. त्याचा शोध लागला तर आपल्या लक्षात येईल की दैन्य, दुःख जाणणारा, तो हटवणारा अगस्ती शतकात एखादाच जन्मतो. बाकी सारे श्वासोच्छ्वास करणारे जीवजंतू असतात, असा माझा अनुभव आहे. तुमचा?


जाणिवांची आरास/१३४