पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सुमारांची सद्दी

      बदल हा सृष्टी नि समाजाचा अटळ घटक आहे. बदलाचा प्रारंभ कल्याणकारी भावनेतून विकासापर्यंत होतो. विकासानंतर विस्तार होतो. कारण त्यात बदलाची उर्मी नसते. विस्तार विकासाच्या गतीचा परिणाम सहज घडून येणारी एक प्रतिक्षिप्त क्रिया. मानवी समाजात या काळात सुमारांची सद्दी होते, दिसते. देशात सध्या ते दिसू लागलंय असा माझा अनुभव आहे.
     ‘मला शिकावंसं वाटत नाही' या लेखातून आजच्या शिक्षणविषयीचे वास्तव मी मांडलं होतं. वर्तमान समाजात सर्वत्र सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा आपल्या चिंता व चिंतनाचा विषय ठरावा असे मला वाटते. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत मनापासून येणा-या व शिकणाच्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. वर्गातील संख्येपेक्षा वर्गाबाहेरील विद्यार्थी संख्या काळजी करण्याइतकी मोठी आहे. शिकण्या व शिकवण्यातील आनंद, आकर्षण, ओढ, जिज्ञासा, उर्मी हरवल्याच्या नुसत्या पाऊलखुणा' नाहीत तर ‘घसघशीत ठसे दिसून येतात. जे शिक्षणाचं तेच चित्र समाजातील अन्य वर्ग व व्यवसायाचे दिसून येतं. पोलीस होण्यामागे कायद्याचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा नाही. काय द्यायचं यावर लक्ष अधिक असं चित्र! इंजिनिअर,आर्किटेक्ट इमारती बांधतात.चार आडव्या-उभ्या रेषा मारणे म्हणजे आराखडे व रेखांकन झाले आहे. उपभोक्त्याची गरज, सोय, सुविधा या बाबत विचार करायला त्यांना वेळ नाही. मॅकॅनिककडे दुरुस्तीसाठी गाडी घेऊन जा. तो दुरुस्त करून देतो नि दुस-याच दिवशी परत तक्रार निघते. डॉक्टरांचं औषध लागू पडेलच याची शाश्वती नाही. पूर्वविचार, निदान,

जाणिवांची आरास/१३१