पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

राजकारणमुक्त गाव

     गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला. या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षापूर्वी गेलो होतो. त्यावेळी गावचे जे दृश्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असं मी आग्रहाने सांगितले होते. त्यावेळी लोक हसले होते. कुणी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव 

निर्मलग्राम बनेल असा माझा विश्वास आहे.

     भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पहायचाआहे ना? मग एखादं खेडे पहा.' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशेने त्यांची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसत्ता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे (दर मिळत नसला तरी!) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिराआवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहेत. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.
    ‘गाव सारं टग्यांचं, बघ्यांचं' असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न

जाणिवांची आरास/१२६