पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवलशाहीतून येणारा गतिमान विकास व समाजवादातून येणारं समाजस्वास्थ्य यांचा मेळ घालणारं नवं तत्त्वज्ञान एकविसावं शतक मागत आहे. असं नवं वारं जो विचार व व्यवहार देऊ शकेल, अशा नव्या विचारधारेची जनता वाट पाहते आहे.
 अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयाने आपल्या नव्या निकालानेही हेच अधोरेखित केले आहे. सन १९७५ नंतर जगभर स्त्री न्यायविषय समाजमन तयार झाले. त्यातून अनेक कुटुंब, बाल, महिला कायदे, आयोग योजना आल्या. आपणास झुकते माप मिळते म्हणून कोणी महिला पुरुषांविरुद्ध कुभांड रचत असेल तर तर्कसंगत जसे नाही तसे न्यायसंगतही नाही. न्याय आंधळा, पण न्यायाधीश डोळस असतात. कायद्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक असते. सरसकट एकाच प्रकारची निकालपत्रे द्यायला न्यायाधीश कशाला हवेत? एटीएमसारखी यंत्रे व यंत्रमानव ती कामे करतील. निवाडा हा मुळात एक सजीव, संवेदी प्रक्रिया आहे. साक्षेपी न्यायाधीशच ती पाळू शकतात. त्यामुळेच न्यायाच्या राज्यावरचा लोकविश्वास वाढत राहील.

 समाजस्वास्थ्य व सामाजिक न्याय या एकविसाव्या शतकातील दोन अशा मानवी गरजा आहेत की, त्याबाबतचा विचार विवेकी व विकास याचा तोल सांभाळत केला गेला पाहिजे. क्षणिक व गतिमान विकास आणि चिरस्थायी विकास यातील अंतर समजावून घेऊन मनुष्य समाजाच्या अंतिम कल्याणाचा विचार हा सर्वतोपरी हे विसरून चालणार नाही. नवे वारे नवं पर्यावरण घेऊन येतात, तशी नवी संस्कृतीही. स्थलांतरित पक्षी जसे सतत निरामय निसर्गाच्या शोधात असतात, तसं माणसानं निरामय समाज जीवनाचं निरंतर ध्यास घेऊन शोधक, चिकित्सक राहायला हवं. गतानुगतिक राहणं जसं धोक्याचं असतं तसं मृगजळामागे गतिमान धावणेही! कोणतेही नवे बदल, विचार हे क्षणिक सुख, सोयीसाठी स्वीकारू नये.

जाणिवांची आरास/१२२