पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


काढायचा म्हणून मग मी समोरच्या ‘किडस् पार्क' (मुलांचं अंगण) वर नजर फिरविली. तिथंही साऱ्या बाल-गोपाळांचा सांभाळ (काला झालेले) पुरुष अर्थात साक्षात बापच करत होते. तेव्हा लक्षात आलं की आता पालकत्वाचं होकायंत्र आईकडून बापाकडे सरकू लागलं आहे. बराच वेळ तिथल्या साऱ्या माशा (आणि कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात डेंग्युचा फैलाव होऊ नये म्हणून डासही) मारून संपले, तेव्हा मी बझारमध्ये फेरफटका मारायचा म्हणून आत प्रवेश करता झालो, तर पहिल्याच कौंटरवर माझ्या गालावर न मारता फटका मारल्यासारखं झालं. एका बिचाऱ्या (आणखी एक) पुरुषास ब्लेड, दाढीचा साबण, बूट पॉलिश, टाय अशा काही आपल्या पुरुषी वस्तू घ्यायच्या होत्या. त्याचा निर्णयही त्याची सौ. च घेताना पाहिलं तेव्हा लक्षात आलं की, या पृथ्वीतलावरच उरलं-सुरलं पुरुषांचं राज्य सपशेल संपलं.
 एव्हाना सौं.ची ती खरेदीनं प्रसन्न झालेली मूर्ती पाहून मनातल्या मनात मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो तर ती विचारती झाली, 'अहो क्रेडिट कार्ड कुठाय?' मला कळेना कुपनच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड कशाला लागतं? मी बावळटपणे विचारलं, 'अगं कुपन आहे ना!' ती उत्तरली (खरंतर खेकसलीच) 'अहो सोफासेट किती छान आहे, कुपन देऊन नुसते दहा हजार द्यायचे आहेत.' ऐकून मला क्षणभर अंधारी आली. पण तेवढ्यात कुणीतरी कानात कुजबुजल्यासारखं ऐकू आलं. 'मैं हूँ ना, आय. सी. आय. सी. आय. बँक!' मग माझ्या लक्षात आला त्या बँकेचा खरा अर्थ. आय. सी. ... मी पाहून घेईन! (तुम्ही वेळेत हप्ता नाही भरला तर!) मी भांबावलेल्या स्थितीतून थोडा भानावर येतो न येतो तेवढ्यात (खरं तर आरोळी) ऐकू आली. 'अहो, रिक्षा नको टेम्पो हवाय दरवानसाहेब.' त्याची शिटी वाजताच अल्लाउद्दीनच्या दिव्यातून जसा लगेच राक्षस येतो तसाच टेम्पो हजर! माझा मात्र एव्हाना सारा टेंपो गेला होता. आपण नोकरी (खरंतर चाकरी) का करतो, सारे पुरुष नोकरी का करतात, ओव्हरटाईम का करतात ते उमगलं. अन् हे कळून तर माझा सारा पुरुषी अहंकार लोपला की या बाजाराचं हे नाव साऱ्या स्त्रियांनी कधी नव्हे त्या एक मतांनी (पुरुषांविरुद्ध कटकारस्थान करून) ठेवलं आहे. एल. फॉर लकी, लेडीज अँड लक्झरी! जे फॉर जंटलमन! जहन्नम में जाव जानेमन!
  This is not Twenty first century, but first century of ladies truly.

***

जाणिवांची आरास/१00