पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


लकी बझार

 ऐन दिवाळीच्या तोंडावर माझ्या हाती एका संस्थेचं बोनस कुपन पडलं. अर्थातच याचा मला आनंद झाला. बोनस नाही का मिळेना, बोनस कुपन तरी! पण याचा खरा आनंद माझ्या सौभाग्यवतीला अधिक झाला. नाही म्हणायला माझा सारा पगार दिवाळी खरेदीवर उडविला तरी हिची खरेदी हौस काही संपली नव्हती. बाजारात अलीकडे सतत तेजी का आहे याचं रहस्य मला त्यादिवशी उमगलं. ते कुपन होतं लकी बझारचं. गेलो (इलाज नव्हता). एकविसाव्या शतकात पुरुषाचा जन्म येणं हे किती दीन-हिन अवस्था प्राप्त होणं आहे ते त्या अडीचशे रुपयांच्या खरेदीसाठी अडीच तास घालविले तेव्हा लक्षात आलं. वरखर्च वेगळाच.
 बाजाराच्या दारात एक महाशय बकोटीला बाळ घेऊन दुसऱ्या हाती ‘बिग शॉपर' घेऊन आपला सारा जीव एकवटून ‘वेटलेफ्टिंग' करत उतरत होते. त्यांच्या मागं त्यांच्या सौ. पर्स, पैसे, पावती सांभाळत ऐटीत रिक्षाचा पुकारा करत्या झाल्या. मी याची देही याची डोळा पाहिलं की बाजाराच्या समोरील त्या सिक्युरिटी गार्डनी बिचाऱ्या मास्टरला सलाम न करता चक्क मॅडमला सॅल्युट ठोकला. प्रवेशद्वाराचं हे दृश्य पाहून पुढे आपल्यावर काय अतिप्रसंग ओढावणार याची पुसटशी पण नीटती कल्पना आली आणि लक्षात आलं की आपण लकी नाही, अनलकी आहोत.

 सौ. नी आत जाताच (नेहमीप्रमाणे) पिशव्या माझ्या हाती सोपविल्या नि महाखरेदीसाठी म्हणून ती गर्दीत अंतर्धान पावली. जेव्हा मी तिच्याबरोबर देवळात जात असतो तेव्हाही ती आपल्या चपला अशाच बिनधास्तपणे माझ्या हवाली (मला हवालदार समजून) करत असते. बाजारात वेळ

जाणिवांची आरास/९९